उसने दिलेले २५ हजार रुपये परत मागितल्याने घरावर दगडफेक; सहा जणांसह सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी : विकी ओहोळ
8446119158
दौंड : उसने दिलेले २५ हजार रुपये परत मागितल्याच्या रागातून एका महिलेच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी येथे घडली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात सहा जणांसह सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लता चांगदेव काळे (वय ४५, रा. हिंगणीबेर्डी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांनी सुभाष भोसले यांना उसने दिलेले २५ हजार रुपये परत मागितले होते. याच कारणावरून २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सहा जण व त्यांच्यासोबत सात अनोळखी व्यक्ती दोन जीपमधून फिर्यादीच्या घरासमोर आले.
यावेळी संबंधितांनी घरावर दगडफेक केली, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घराच्या दरवाजाची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकारामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार किरण पांढरे करीत आहेत.