समान नागरी कायद्यावर जनतेचा कौल जाणून घेणार! २९ नोव्हेंबरला पुणे विभागात जनसुनावणी; नागरिकांना मत मांडण्याची संधी
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर!
पुणे, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याबाबत नागरिकांच्या अपेक्षा, मते, सूचना आणि हरकती जाणून घेण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पुणे विभागात रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय स्तरावर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीच्या माध्यमातून नागरिकांना समान नागरी कायद्याबाबत आपले विचार थेट मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संबंधित गट, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
पुणे महसूल विभागातील ही जनसुनावणी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांसाठी जिल्हानिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र वेळ देण्यात आली असून, त्या-त्या जिल्ह्यातील नागरिकांना निर्धारित वेळेत आपली मते मांडता येणार आहेत.
🔸असे असेल जिल्हानिहाय वेळापत्रक
जनसुनावणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
– सातारा जिल्हा : सकाळी १० ते ११
– सांगली जिल्हा : सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०
– सोलापूर जिल्हा : दुपारी १ ते २
– कोल्हापूर जिल्हा : दुपारी ३ ते सायंकाळी ४
– पुणे जिल्हा : सायंकाळी ४.३० ते ५.३०
🔷प्रत्यक्ष आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
या जनसुनावणीसाठी नागरिकांना दोन प्रकारे सहभागी होता येणार आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी समितीच्या सदस्यांसमोर प्रत्यक्ष घेतली जाणार आहे. तर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची मते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समितीसमोर मांडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणीच्या निर्धारित वेळेच्या किमान एक तास आधी नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यानुसार नागरिकांनी वेळेचे नियोजन करून सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
🟡ऑनलाइन पद्धतीनेही नोंदविता येणार मते
ज्या नागरिकांना प्रत्यक्ष जनसुनावणीला उपस्थित राहणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी ऑनलाइन पद्धतीने आपली मते नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत समान नागरी कायदा पोर्टलवर ३७ मुद्द्यांच्या माध्यमातून नागरिकांना आपले विचार, सूचना आणि मते नोंदविता येणार आहेत.
यासाठी नागरिकांनी www.ucc.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
🟢नागरिकांच्या सहभागाला महत्त्व
समान नागरी कायदा हा सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा विषय असल्याने या संदर्भात विविध घटकांची मते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिक, सामाजिक संस्था, विविध संघटना, संबंधित गटांचे प्रतिनिधी आणि कायदेविषयक जाणकारांनी या जनसुनावणीत सहभागी होऊन आपले म्हणणे मांडावे. नागरिकांच्या सूचना आणि मते या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
या जनसुनावणीच्या माध्यमातून समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागातील नागरिकांचा दृष्टिकोन आणि अपेक्षा जाणून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.