स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वादात उल्हासनगर महापालिकेचे २१.९० लाख रुपये वकिलांवर खर्च!
आरटीआयमधून खर्चाचा तपशील समोर; संबंधित याचिकाकर्त्यांकडून रक्कम वसूल करण्याची ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांची मागणी
उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून निर्माण झालेल्या न्यायालयीन वादाचा आर्थिक भार महापालिकेला सहन करावा लागला आहे. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मिळालेल्या प्रमाणित कागदपत्रानुसार, या प्रकरणाशी संबंधित सात न्यायालयीन नोंदींसाठी वकिलांच्या फीपोटी तब्बल २१ लाख ९० हजार रुपये खर्च झाल्याचे नमूद आहे.
उपलब्ध कागदपत्रात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील प्रकरणांचे क्रमांक, याचिकाकर्त्यांची नावे, वकिलांची नावे आणि त्यांना देण्यात आलेल्या रकमेचा तपशील देण्यात आला आहे. यामध्ये राजेश वधारिया, प्रदीप रामचंदानी आणि महापौर उल्हासनगर महानगरपालिका यांच्याशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांचा समावेश आहे.
या खर्चामध्ये एका प्रकरणासाठी ७ लाख रुपये, दुसऱ्या प्रकरणासाठी ६ लाख रुपये, तर अन्य प्रकरणांसाठी ६० हजार, ३ लाख ५० हजार आणि ३ लाख रुपये अशा रकमा नमूद आहेत.
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राजकीय वर्चस्वाची लढाई न्यायालयापर्यंत पोहोचली. या वादात महापालिकेला प्रतिवादी म्हणून न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी व्हावे लागले आणि वकिलांवर मोठी रक्कम खर्च करावी लागली.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी संबंधित याचिकाकर्त्यांकडून हा खर्च वसूल करण्याची मागणी केली आहे. राजकीय वादातून निर्माण झालेल्या न्यायालयीन संघर्षाचा आर्थिक भार करदात्यांच्या पैशातून का उचलावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मात्र, ही रक्कम संबंधित याचिकाकर्त्यांकडून वसूल करता येईल का, याबाबत कायदेशीर तरतुदी आणि सक्षम प्राधिकरणाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.