श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह संपन्न..
अमळनेर :विक्की जाधव.
हिंदू संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला परंपरागत अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री तुळशी मातेच्या विवाहानंतर वधू-वरांच्या ब्रम्हगाठी विवाह सोहळ्यांच्या रूपाने बांधल्या जातात. ही परंपरा कायमस्वरूपी टिकून राहावी, श्री मंगळग्रह मंदिरात येणाऱ्या विवाहेच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराची विशेष आराधना करावी, या उद्देशातून मंगळग्रह सेवा संस्थेने अतिशय शुभ व परम पवित्र अशा त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह सोहळ्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे. यंदाचे हे 15 वे वर्ष आहे.

मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 15 मिनिटे या शुभ मुहूर्तावर अतिशय भक्तिमय व मंगलमय वातावरणात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा हजारो वऱ्हाडींच्या रूपाने उपस्थित भाविकांच्या ‘याची देही याची डोळा’ साक्षीने वैदिक पद्धतीने पार पडला. सर्व प्रकारच्या खर्चिक बाबींना फाटा देऊन सनातन व साध्या पद्धतीने संस्कृतीबद्ध हा कार्यक्रम झाला. वर राजा भगवान श्री विष्णूजी यांचे मामा म्हणून पिळोदे (ता. अमळनेर, ह. मु. पुणे) येथील भटू प्रकाश शिंदे, तर वर राणी श्री लक्ष्मी माता यांचे मामा म्हणून अमळनेर येथील सुनील माणिक बिऱ्हाडे (ह. मु. जळगाव) यांनी भूमिका निभावली. या विवाह सोहळ्यानिमित्त सकाळी श्री मंगळग्रह देवांच्या महाआरतीनंतर दिवसभर मंदिर परिसरात भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.
तत्पूर्वी, वर राजा भगवान श्री विष्णूजी व वर राणी श्री लक्ष्मी माता यांची संबळ वाद्याच्या साथीने मंगलरथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक भाविकांनी जल्लोषपूर्ण नृत्याचा आनंद घेतला. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव व प्रसाद भंडारी यांनी मुख्य पौरोहित्य करीत विधिवत मंगलाष्टके म्हटली. त्यांना पुरोहित जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, अतुल जोशी, विनोद पाठक चंद्रकांत जोशी, उमेश पाठक, चेतन नाईक, प्रवीण भंडारी यांनी सहकार्य केले.
हा सोहळा यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुळकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी सौ. आशाताई महाले, प्रकाश मेखा, विनोद कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण यांच्यासह मंदिराच्या सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.