धोबी समाजाच्या आरक्षण लढ्याला नवी दिशा; अमरावतीत राष्ट्रीय समितीची स्थापना

अपनी भाषा में पढ़े! Translate

samaj

धोबी समाजाच्या आरक्षण लढ्याला नवी दिशा; अमरावतीत राष्ट्रीय समितीची स्थापना

डॉ. तुषार रंधे राष्ट्रीय अध्यक्षपदी; राष्ट्रपती कार्यालयाकडून ५३४ पानी याचिका केंद्र सरकारकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार

धुळे प्रतिनिधी : धोबी समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या मागणीला गती देण्यासाठी अमरावती येथे २१ व २२ नोव्हेंबर रोजी आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अखिल धोबी समाज आरक्षण न्यायिक समितीची राष्ट्रीय स्तरावर स्थापना करण्यात आली असून, राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. तुषारजी विश्वासराव रंधे (शिरपूर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या भूमीत पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. भाऊसाहेब तुषारजी रंधे होते. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

५३४ पानी याचिका केंद्र सरकारकडे वर्ग

भंडारा व बुलढाणा जिल्ह्यांतील धोबी समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करत समितीच्या वतीने राष्ट्रपती कार्यालयाकडे ५३४ पानी याचिका सादर करण्यात आली होती. ही याचिका पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात आली असून, तिला स्वतंत्र पिटीशन क्रमांकही मिळाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने बार्टी संस्थेला आरक्षणासंदर्भात रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (RGI) यांच्याकडे सादर करण्यासाठी सुधारित व परिपूर्ण अहवाल तयार करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

राष्ट्रीय समितीसह युवा परिषद व पत्रकार महासंघाची स्थापना

बैठकीत समाजाच्या संघटनात्मक विस्तारासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. तुषारजी रंधे, तर राष्ट्रीय मुख्य समन्वयकपदी राजेंद्रजी उंबरकर यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य आरक्षण न्यायिक समितीच्या अध्यक्षपदी सनतजी रामभाऊ वाढई यांची निवड झाली.

युवकांना संघटित करण्यासाठी अखिल धोबी समाज युवा परिषदेची स्थापना करून महाराष्ट्र अध्यक्षपदी गणेशजी मढीकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी अखिल धोबी समाज पत्रकार महासंघाची स्थापना करण्यात आली असून, महाराष्ट्र अध्यक्षपदी भोकरदन येथील संजयजी पैठणकर यांची निवड करण्यात आली.

एकजुटीने आरक्षणाचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार

समारोपप्रसंगी डॉ. तुषार रंधे यांनी समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयीन लढा, प्रशासकीय पाठपुरावा आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षणासोबत आरक्षणही समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वाचे असून, सर्वांच्या एकजुटीने हा लढा पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत खंडेराव कडलग, राजाभाऊ उंबरकर, प्रा. सदाशिव ठाकरे, अॅड. अतुल बच्छाव, सुधीर पाटोळे, श्रीकांत उंबरकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे आयोजन राजाभाऊ उंबरकर यांनी केले.

आरक्षणाचा न्यायालयीन लढा, राष्ट्रीय संघटनात्मक बांधणी, युवकांचे संघटन आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यासपीठ अशा चार दिशांनी अमरावती येथील बैठक धोबी समाजाच्या चळवळीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली.

925448134_4047713398692823_4240709668603714387_n

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!