कत्तलखाना बंदच्या आंदोलनाने अमळनेरचे राजकारण तापले!
भाजीपाला मार्केटसह व्यापारी संघटनांचा बंदला पाठिंबा; आमदार मुंबईत, माजी आमदार नंदुरबारात; नगराध्यक्षांसमोर नगरसेवकांच्या भूमिकेचे आव्हान
अमळनेर : विक्की जाधव.
कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, या मागणीसह विविध मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने आज शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी अमळनेरात जनआक्रोश आंदोलन व बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने आंदोलनाचे स्वरूप व्यापक झाले असून, भाजीपाला असोसिएशननेही २७ नोव्हेंबर रोजी भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. किरकोळ भाजीपाला विक्रेता असोसिएशन आणि भाजीपाला अडत असोसिएशनने लिलाव मार्केट बंद राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी आपला माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन केले आहे. भाजीपाला मार्केटसोबतच व्यापारी असोसिएशन, मोबाईल शॉप, कपडा दुकानदारांसह विविध संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याने अमळनेरातील वातावरण आंदोलनमय झाले आहे. शहरातील एका प्रमुख मागणीभोवती विविध व्यावसायिक आणि सामाजिक संघटना एकत्र येत असल्याने प्रशासन तसेच नगरपालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर नगरपालिका आणि प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, हा आजच्या आंदोलनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरातील राजकीय नेत्यांची भूमिका काय राहणार, याचीही उत्सुकता आहे.
खा. वाघ यांची भूमिका अस्पस्ट तर, विद्यमान आमदार अनिल पाटील हे मुंबई दौऱ्यावर असल्याची माहिती आहे, तर माजी आमदार शिरीष चौधरी हे नंदुरबार येथे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शहरातील या महत्त्वाच्या आंदोलनाच्या वेळी प्रमुख राजकीय नेतृत्व प्रत्यक्ष मैदानात नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः आंदोलनात विविध राजकीय विचारांचे कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता असल्याने त्याचा राजकीय अर्थ कसा लावला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नगरपालिकेतही या आंदोलनामुळे अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता..
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी काल सायंकाळपर्यंत अनेक नगरसेवकांशी संपर्क साधून मोर्चा नगरपालिका कार्यालयात येण्यापूर्वी उपस्थित राहण्याचे आवाहन केल्याची माहिती आहे. काही नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तर काहींनी स्पष्टपणे असमर्थता दर्शविल्याची चर्चा आहे. नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांमध्ये ताळमेळ नसल्याने आजच्या आंदोलनावेळी कोण उपस्थित राहणार आणि कोण गैरहजर राहणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
‘नगरपालिका आणि शहराच्या हिताचा निर्णय घेण्याची जबाबदारी आमची आहे; मात्र निर्णय घेण्याचे अधिकारच उरले कुठे आहेत?’ अशी खदखद एका नगरसेवकाने व्यक्त केली . दुसरीकडे, काही नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका वेक्त केली. ऐन आंदोलनाच्या वेळी नगरपरिषदेतील गटबाजी आणि अंतर्गत मतभेद उफाळून आल्यास त्याचा थेट परिणाम नगराध्यक्षांच्या भूमिकेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या नेतृत्वाचीही कसोटी पाहणारा ठरणार आहे. ते उपस्थित असणार की नाही हे ही महत्वाचे असणार आहे.
उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या भूमिकेकडेही लक्ष.. विविध मोर्चे आणि आंदोलनांमध्ये आपला धिंडोरा पिटणारे, मी म्हणजे मीच “” आघाडीवर दिसणारे उपनगराध्यक्ष आजच्या आंदोलनात नेमकी कोणती भूमिका घेतात, याबाबत शहरात चर्चा रंगली आहे. निव्वळ पदाचा उपभोग भोगण्यासाठी नव्हे तर त्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे.
दुसरीकडे , प्रकृतीच्या कारणास्तव नगरसेवक आणजी बाबू अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा असून, कालच तब्येतीचे कारण दाखवून एका दवाखान्यात ऍडमिट होणार असल्यानें देखील राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्या समाजाने बाबुला मते देऊन नगरपरिषदेवर प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवले आज तोच समाज संपूर्ण मार्केट बंद ठेवत असून बाबूने तब्येतीच्या कारणास्तव जबाबदारीपासून पळ काढला आहे. ‘अमळनेरच्या हिताचा निर्णय घेण्याची वेळ आली असताना पळणाऱ्या बाबू लवकरच खरा चेहरा घेऊन समाजा समोर येणार यात शंका नाही.
याशिवाय हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनात शिवसेनेचे काही माजी पदाधिकारीही सहभागी होण्याची शक्यता असल्याने माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भूमिकेकडेही विशेष लक्ष लागले आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शहरातील मुख्य प्रवेशद्वाराला नाव देण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही शिवसैनिकांवर त्यावेळी पक्षीय कारण दाखवत कारवाई झाली होती. आता तेच माजी कार्यकर्ते पुन्हा या आंदोलनात दिसल्यास त्यावर माजी आमदारांची प्रतिक्रिया काय असेल, याची उत्सुकता आहे.
एकंदरीत, कत्तलखाना बंदच्या मागणीवरून सुरू झालेले आंदोलन आता केवळ एका मागणीपुरते मर्यादित राहिलेले नसून त्यातून अमळनेरच्या राजकारणातील अंतर्गत समीकरणे, नगरपालिकेतील मतभेद आणि विविध राजकीय गटांची भूमिका उघड होण्याची शक्यता आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर नगरपालिका काय निर्णय घेते, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर कोणती भूमिका घेतात, नगरसेवकांची उपस्थिती किती राहते आणि अनुपस्थित राहणारे नेमके कोणते कारण पुढे करतात, यावर आजच्या आंदोलनाचे पुढील राजकीय पडसाद अवलंबून असतील. त्यामुळे कत्तलखाना बंदच्या आंदोलनासोबतच आज अमळनेर नगरपालिकेच्या राजकारणाचीही कसोटी लागणार आहे.