श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा; २७ विद्यार्थिनींनी मांडले विचार
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन सकाळ व दुपार अशा दोन्ही विभागांत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करून संविधानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी होत्या. यावेळी उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ शिक्षिका आर. एस. सोनवणे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी शामभाऊ पवार उपस्थित होते.
प्रमुख वक्त्या सौ. वाय. एम. पाटील आणि सौ. मीनाक्षी पाटील यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, मूलभूत अधिकार, कर्तव्ये तसेच समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या संविधानिक मूल्यांविषयी विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी एकूण २७ विद्यार्थिनींनी भाषणांद्वारे आपले विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार प्राप्त झाले असून विद्यार्थिनींनी या अधिकारांचा योग्य उपयोग करावा, असे आवाहन केले. भारतीय संविधान हा देशाच्या लोकशाहीचा आत्मा असून प्रत्येकाने संविधानिक मूल्यांचा आदर करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उत्कृष्ट भाषण करणाऱ्या कु. मयुरी महाजन, वैष्णवी पाटील, रुश्वी साळुंखे, नव्या पाटील आणि तनिष्का पाटील यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी संघप्रमुख सौ. पी. व्ही. साबे आणि सौ. पी. एस. सराफ यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. टी. आर. चव्हाण आणि सौ. आर. एस. सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.