अखेर अमळनेरातील अनधिकृत कत्तलखान्यावर प्रशासनाचा हातोडा; कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांचे उपोषण मागे!
अमळनेर | विक्की जाधव

अमळनेर शहरातील अनधिकृत कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनआक्रोश आंदोलनाला अखेर यश आले आहे. नगरपालिका प्रशासनाने संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाई करत हातोडा चालविल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन बेमुदत आमरण उपोषण मागे घेतले.
शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी अनधिकृत कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी जनआक्रोश आंदोलन आणि बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक, व्यापारी संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. भाजीपाला असोसिएशननेही २७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भाजी मार्केट बंद ठेवून आंदोलनाला समर्थन दिले होते. त्यामुळे प्रशासनावर कारवाईसाठी दबाव वाढला होता.
अखेर अमळनेर नगरपालिका प्रशासनाने नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. प्रशासनाच्या या कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन आंदोलकांनी उपोषणाची सांगता केली.
प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कारवाई केल्याने शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईचे सकल हिंदू समाज बांधवांकडून स्वागत करण्यात येत असून, आंदोलनाचा अखेर सकारात्मक आणि निर्णायक शेवट झाला.
यावेळी खासदार स्मिता उदय वाघ, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, प्रशांत निकम, पंकज चौधरी, पंकज भोई, श्रीराम चौधरी, दीपक चौगुले, दिगंबर महाले सर, सूरज परदेशी, तुळशीराम आटकर, महेश देशमुख, दादा पवार, कैलास पाटील, सुयोग धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.