करमाळा प्रतिनिधी : करमाळा नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाच्या प्रोत्साहनात्मक अभय योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील दंडामध्ये ५० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे. करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि सर्व नगरसेवकांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय मार्गी लागला असून, सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘शिवकन्या अकॅडमी’च्या सर्वेसर्वा प्रियांका गायकवाड यांनी नगरपरिषद पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
करमाळा शहरातील नागरिकांकडून मालमत्ता करावरील दंडात सवलत मिळावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. सद्यस्थितीत उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. हीच बाब लक्षात घेऊन आणि सर्वसामान्यांच्या खिशाची जाण ठेवून नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे विशेष प्रस्ताव सादर केला आणि या अभय योजनेला मंजुरी मिळवून आणली.
या निर्णयाचे स्वागत करताना प्रियांका गायकवाड म्हणाल्या की, “सावंत परिवार नेहमीच गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीचा विचार करून नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी दंडात ५० टक्के माफी मिळवून दिली, हा करमाळावासियांसाठी खूप मोठा दिलासा आहे. त्यांच्या या लोकाभिमुख कार्याचे मनापासून अभिनंदन असून, करमाळाकर त्यांची ही कामगिरी कायमस्वरूपी स्मरणात ठेवतील.”