१० ते १५ टक्के मासिक परताव्याचे आमिष; बारामतीतील ‘बिग बुल’ प्रकरणात ६५ लाखांची फसवणूक उघड, आणखी पीडितांनी पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
शेअर मार्केट आणि फॉरेक्स ट्रेडिंगमधून दरमहा १० ते १५ टक्के निश्चित परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आणखी फसवणूकग्रस्तांनी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८, ३४० सह ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंद असून तपास सुरू आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कार्तिक अरविंद नाळे, गौरव अरविंद नाळे, बिग बुल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिंग अँड फायनान्स तसेच बिग बुल ट्रेडिंग कंपनी यांनी स्वतःला शेअर मार्केटमधील अनुभवी ट्रेडर, गुंतवणूक तज्ज्ञ आणि सेबी मान्यताप्राप्त व्यक्ती असल्याचे भासवून नागरिकांना विविध गुंतवणूक योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले.
आरोपींकडून गुंतवणूकदारांना दरमहा १० ते १५ टक्के निश्चित परतावा, मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहील, तोटा झाल्यास जबाबदारी आमची राहील आणि मुदत संपल्यानंतर संपूर्ण रक्कम परत केली जाईल, अशी आश्वासने देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या आश्वासनांवर विश्वास ठेवून फिर्यादी व इतर साक्षीदारांनी रोख, यूपीआय, एनईएफटी, आरटीजीएस आदी माध्यमांतून सुमारे ६५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे उघड झाले आहे.
तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये एका गुंतवणूकदाराकडून स्वीकारलेल्या ४९ लाख रुपयांच्या रकमेबाबत आरोपींनी नोटरीकृत करारनाम्यात स्पष्ट कबुली दिल्याचे समोर आले आहे. या करारनाम्यात दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा उल्लेख असून संबंधित गुंतवणूकदारास परतावा व मूळ रक्कम न दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय काही गुंतवणूकदारांना सुरक्षिततेच्या नावाखाली देण्यात आलेले धनादेश अनादरित (डिशॉनर) झाल्याची बाबही तपासात उघड झाली आहे.
या प्रकरणात आणखी अनेक नागरिकांनी गुंतवणूक केलेली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून अद्याप अनेक पीडित समोर आलेले नसल्याचा संशय आहे. त्यामुळे बिग बुल ट्रेडिंग कंपनी, बिग बुल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिंग अँड फायनान्स किंवा संबंधित व्यक्तींच्या माध्यमातून शेअर मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंग, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, ट्रेडिंग कोर्स किंवा निश्चित परतावा योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व नागरिकांनी तातडीने बारामती शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रक्तदीप भंडारे करीत आहेत.
फसवणूकग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या प्रकरणातील सर्व पीडितांचा शोध घेण्यासाठी बारामती शहर पोलीस कटिबद्ध असल्याचे सांगत, संबंधित माहिती, कागदपत्रे किंवा पुरावे असलेल्या नागरिकांनी तपासास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्राप्त होणाऱ्या माहितीची व कागदपत्रांची गोपनीयता राखली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.