टाकीत उतरले उपनगराध्यक्ष, पण बाकीचे लोकप्रतिनिधी कुठे होते?

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260625-WA0492

टाकीत उतरले उपनगराध्यक्ष, पण बाकीचे लोकप्रतिनिधी कुठे होते?

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील गढूळ पाण्याच्या प्रश्नाने सध्या संपूर्ण शहर ढवळून निघाले असून, या गंभीर प्रश्नावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. शहरातील विविध भागांत अनेक दिवसांपासून गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत असताना, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी मात्र थेट मैदानात उतरून परिस्थितीची पाहणी करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

शहरातील विविध भागांची पाहणी करूनही समस्येचे मूळ सापडत नसल्याने निकम यांनी थेट कोर्ट परिसरातील पाण्याच्या टाकीवर धडक दिली. टाकीवरून निरीक्षण करूनही समाधान न झाल्याने त्यांनी दोराच्या सहाय्याने थेट टाकीत उतरून पाहणी केली. टाकीतील धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर त्यांनी केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि शहरात एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे, सत्तेत असतानाच सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर बोट ठेवत उपनगराध्यक्षांनीच जनतेसमोर वास्तव मांडल्याने अनेकांचे धाबे दणाणले. “गेल्या २० ते २२ वर्षांपासून ही टाकी साफ झाल्याचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही,” असा गंभीर दावा निकम यांनी केला. या दाव्याला शहर विकास आघाडीचे जितेंद्र ठाकूर यांनीही दुजोरा दिला.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. आरोप-प्रत्यारोप, स्पष्टीकरणे आणि फोनाफोनी सुरू झाली. मात्र या सगळ्या गदारोळात उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी कोणालाही उत्तर न देता थेट दोन दिवस टाकीवर ठाण मांडत साफसफाई पूर्ण करण्यावर भर दिला.

शहरात पाणीटंचाई असताना “आधी पाणी सोडा” असा दबाव वाढत होता. मात्र टाकीतील घाण पाहता असे पाणी नागरिकांना देणे म्हणजे त्यांच्या आरोग्याशी खेळ ठरला असता. त्यामुळे “आधी टाकी स्वच्छ, मगच पाणीपुरवठा” या भूमिकेवर निकम ठाम राहिले. या निर्णयामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली, तर अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थनही केले.

दरम्यान, एवढ्या गंभीर प्रश्नावर पालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि अनेक लोकप्रतिनिधी मात्र संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित राहिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. विशेष म्हणजे, माजी नगराध्यक्षा तथा विरोधी गटाच्या प्रमुख नेत्या जयश्रीताई पाटील याही या ठिकाणी फिरकल्या नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे विरोधक प्रत्यक्ष कृतीच्या वेळी कुठे होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

विरोधकांनी पाणीप्रश्नावर मोर्चा आणि बैठकींचे आयोजन केले, मात्र प्रत्यक्ष टाकी साफ करण्याच्या मोहिमेत विरोधी गटातील एकही नगरसेवक दिसून न आल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे “पाणीप्रश्नावर राजकारण अधिक आणि कृती कमी” अशी टीका सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

दुसरीकडे, पालिकेचे मुख्याधिकारीही या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील गंभीर प्रश्नांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे अपेक्षित असताना, तसे चित्र दिसून न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

कोर्ट परिसरातील टाकीची साफसफाई पूर्ण झाल्यानंतर आता शहरातील इतर सर्व टाक्यांचीही तातडीने स्वच्छता व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. राजकारण बाजूला ठेवून नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी कसे मिळेल, यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

गेल्या दोन दिवसांत घडलेल्या या संपूर्ण घडामोडींनंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे पाणीप्रश्नावर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, थेट टाकीत उतरून काम करणारे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम हेच सध्या अमळनेर पालिकेचे “ॲक्शन हिरो” ठरत असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!