करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड): केवळ उत्सव साजरा करणारे मंडळ नव्हे, तर नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवणारे अग्रणी मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करमाळ्याच्या मानाचा गणपती ‘लोकप्रिय हनुमान तरुण मंडळ, किल्ला वेस’ यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे दिसून आले आहे . मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आणि आगामी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, श्री जगदंबा कमलाभवानी मंदिर परिसरात आयोजित भव्य ‘स्वच्छता महाअभियानात’ या मंडळाने अत्यंत उत्साहात आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आई कमलाभवानीच्या चरणी आपली स्वच्छता सेवा अर्पण केली.
लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाने यापूर्वीही श्रमदानातून ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेचे अनेक स्तुत्य उपक्रम राबवले आहेत. यामध्ये भुईकोट किल्ला स्वच्छता मोहीम आणि ऐतिहासिक बारव विहीर स्वच्छता मोहिमेचा समावेश आहे. या माध्यमातून गडकिल्ले जपणूक, पर्यावरण संवर्धन आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाचा एक आदर्श त्यांनी शहरात निर्माण केला आहे.
“स्वच्छ मंदिर, सुंदर परिसर – आपली जबाबदारी” हा संदेश देत ग्रामपंचायत श्रीदेवीचामाळ, राजे रावरंभा मित्र मंडळ आणि देवराई ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदान केले.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. राख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे विद्यार्थी, योद्धा अकॅडमीचे विद्यार्थी, देवळाली येथील ग्रामस्थ, संत निरंकारीचे सदस्य, बाहेर तालीम तरुण मंडळाचे सदस्य, सदगुरू बैठकीचे सदस्य, राजे रावरंभा तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील अनेक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सर्वांच्या सामूहिक श्रमातून मंदिर परिसर लख्ख आणि सुंदर करण्यात आला. करमाळा तालुक्यात राबवलेला हा उपक्रम सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत असून इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.