नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच! छापील कागदात खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा कधी?
शिरपूर : शहरासह तालुक्यातील अनेक हॉटेल, वडापाव केंद्रे, भजी-समोसा विक्रेते आणि फास्ट फूड व्यावसायिक सर्रासपणे वर्तमानपत्राच्या छापील कागदामध्ये खाद्यपदार्थ पॅक करून ग्राहकांना देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अन्न सुरक्षा नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना संबंधित प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
वर्तमानपत्रावर छापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये विविध प्रकारची रसायने असतात. गरम, तेलकट किंवा ओलसर खाद्यपदार्थ अशा कागदाच्या संपर्कात आल्यास ही रसायने अन्नामध्ये मिसळून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तरीही काही व्यावसायिक नफेखोरीसाठी ग्राहकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे दिसून येत आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) छापील वर्तमानपत्र, मासिके किंवा पुनर्वापर केलेल्या कागदामध्ये अन्नपदार्थ देण्यास बंदी घातली असतानाही अनेक ठिकाणी या नियमांचे खुलेआम उल्लंघन होत आहे. विशेष म्हणजे बाजारपेठा, शाळा-महाविद्यालय परिसर आणि गर्दीच्या भागांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागाने संयुक्त तपासणी मोहीम राबवून अशा व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. केवळ नोटिसा देऊन चालणार नाही, तर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.
नागरिकांच्या आरोग्यापेक्षा कोणाचाही व्यवसाय मोठा असू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ जागे होऊन दोषींवर कारवाईचा बडगा उगारावा, अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक परिणामांची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.