२५१ वर्षांची अखंड परंपरा; सद्गुरू संत सखाराम महाराजांची पायी वारी १ जुलैपासून पंढरीकडे होणार रवाना
अमळनेर : विक्की जाधव.
“ओढ लागलीयां पंढरीची” या भक्तिभावाने भारावलेल्या वातावरणात श्री सद्गुरू संत सखाराम महाराज संस्थानतर्फे अमळनेर ते पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळा २०२६ यंदा १ जुलैपासून प्रारंभ होत आहे. तब्बल २५१ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या दिंडी सोहळ्याला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. मूळ सद्गुरू संत श्री सखाराम महाराज यांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी पंढरपूर वारीस सुरुवात केली होती. १७७५ मध्ये सुरू झालेली ही भक्तिमय परंपरा आजही अविरतपणे सुरू असून हजारो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र बनली आहे.

यंदाची दिंडी १ जुलै रोजी अमळनेर बोरी काठावरील तुळशी बाग येथून मार्गस्थ होणार असून सडावण पारोळा, भडगाव, नगरदेवळा, नेरी, नागापूर, पिशोर, चिखलठाणा, दौलताबाद, पैठण, शेवगाव, पाथर्डी, आष्टी, करमाळा, करकंब आदी गावांमधून प्रवास करीत २३ जुलै रोजी पंढरपूर नगरीत दाखल होणार आहे. मार्गक्रमणादरम्यान विविध ठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत, भजन-कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेला हा दिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडणार आहे. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल-विठ्ठल” च्या गजरात पंढरीच्या दिशेने निघणाऱ्या या दिंडीत सहभागी होण्यासाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, २४ जुलै रोजी पंढरपूर येथे माऊलींच्या दिंडींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे.