पुणे विभागात खताच्या काळाबाजारावर कृषी विभागाचा मोठा दणका; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे
पुणे, प्रतिनिधी — वर्षा चव्हाण
शेतकऱ्यांना दर्जेदार खते योग्य दरात उपलब्ध व्हावीत तसेच खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने पुणे विभागात (पुणे, अहिल्यानगर व सोलापूर) विशेष तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११३ खत विक्री परवान्यांवर कारवाई करण्यात आली असून, ७ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत.
कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान एकूण २,५७६ खत विक्री केंद्रांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये २८१ ठिकाणी अनियमितता आढळून आली असून २७७ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच १०७ खत विक्री परवाने निलंबित, ६ परवाने रद्द करण्यात आले.
जिल्हानिहाय कारवाईत पुणे जिल्ह्यात ६५० खत विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७१ प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून २७ परवाने निलंबित करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्यात ८१२ केंद्रांची तपासणी झाली. साठेबाजी व इतर नियमभंगामुळे १६ परवाने निलंबित, २ परवाने रद्द करण्यात आले असून ३ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १,१२९ केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीत १८ खतांचे नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले. या जिल्ह्यात ६४ परवाने निलंबित, ४ परवाने रद्द करण्यात आले असून ४ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनुदानित युरियाचा औद्योगिक वापर रोखण्यासाठी विभागातील ४२ औद्योगिक युनिट्सचीही तपासणी करण्यात आली. यापुढेही खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिला आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खते खरेदी करण्याचे तसेच खत विक्रीबाबत कोणतीही तक्रार असल्यास नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.