विस्थापित मेंढपाळ कुटुंबातून प्राचार्यपदापर्यंतचा प्रवास; भाऊ काळे यांचा संघर्ष विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी..
प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि गरीब कुटुंबात जन्म घेऊन शिक्षणाच्या जोरावर पीएच.डी.पर्यंत मजल मारणारे नव महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊ लक्ष्मण काळे यांचा जीवनप्रवास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे मत पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रमोद मानसिंगराव जाधव यांनी व्यक्त केले.
सरस्वती शिक्षण मंडळाच्या नव महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भाऊ काळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात ते बोलत होते. यावेळी डॉ. गोविंदराव कोकरे, कल्याणराव जगताप, डी. बी. जगताप, राजेंद्र कोकरे, के. वाय. जगताप, डॉ. अजित जगताप, संजय महादेव जगताप, प्रा. अनिल धुमाळ, प्राचार्य एम. एस. वाघ, पर्यवेक्षक जी. एम. तारू यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमोद जाधव म्हणाले की, दुष्काळामुळे विस्थापित झालेल्या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या भाऊ काळे यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली. त्यांनी मराठी, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल या चार विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून बी.एड. व बी.पी.एड. पदव्याही प्राप्त केल्या आहेत. तसेच ग्रामीण भागातील जलस्रोत व पाणीपुरवठा या विषयावर त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे.
शिक्षण घेत असताना त्यांनी फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यात वेल्डर म्हणून काम केले. त्या कामातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. 29 जून 1995 रोजी नव महाराष्ट्र विद्यालयात उपशिक्षक म्हणून रुजू झालेल्या काळे यांनी तब्बल 31 वर्षांची यशस्वी शैक्षणिक कारकीर्द पूर्ण करत याच संस्थेत प्राचार्यपदावरून सेवानिवृत्ती स्वीकारली.
सेवानिवृत्ती प्रसंगी बोलताना भाऊ काळे यांनी विद्यालयापासून दूर जाताना मनाला वेदना होत असल्याची भावना व्यक्त केली. यापुढे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा संकल्प व्यक्त करत त्यांनी विद्यालयाला 1 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी विद्यालयाचे ग्रंथपाल रमेश मारुती गलांडे यांचाही सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेखा मोरे यांनी केले.