अमळनेर फार्मसी महाविद्यालयाची उज्ज्वल कामगिरी कु. वैष्णवी जेठवा हिने एरंडोल येथील ई-पोस्टर स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक
अमळनेर : विक्की जाधव.
एरंडोल (टोळी) येथील डॉ. एन. के. आर. शिरोडे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’ (World Pharmacist Day) निमित्त ई-पोस्टर स्पर्धेत अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. श्री. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी व स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसीच्या विद्यार्थिनीने उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
या स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी जेठवा हिने आपल्या कल्पकतेचा व सर्जनशीलतेचा प्रभावी वापर करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिला आकर्षक रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
“ई-पोस्टर स्पर्धेची घोषणा झाल्यापासून माझ्या मनात या विषयाची संकल्पना स्पष्ट होती. मात्र, त्या संकल्पनेला अंतिम आणि प्रभावी स्वरूप देण्याचे काम *प्रा. देवेश भावसार* यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले. त्यांनी पोस्टरच्या प्रत्येक लहान-सहान तांत्रिक बाबींवर, विषयाची मांडणी आणि सादरीकरण यावर बारकाईने लक्ष केंद्रित केले. जेव्हा जेव्हा माझा आत्मविश्वास कमी झाला, तेव्हा त्यांचे प्रोत्साहन आणि वेळोवेळी मिळालेले तांत्रिक मार्गदर्शन माझ्यासाठी अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी माझा विषय प्रभावीपणे मांडू शकले आणि हे यश संपादन करू शकले.”
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते यशाची शिखरे गाठू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षकांना देत विद्यार्थिनीने व्यक्त केलेली कृतज्ञता आणि तिची यशस्वी वाटचाल याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन मा. योगेश मुंदडे, प्राचार्य डॉ. धनंजय एम. पाटील, समन्वयक प्रा. डॉ. एम. एस. वाघ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. वैष्णवी जेठवा हिचे विशेष कौतुक करून तिच्या आगामी उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.