अमळनेर तालुक्यातील आमसभेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांचे प्रशासनाला स्मरणपत्र.
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यात गेल्या सात वर्षांपासून एकही अधिकृत आमसभा आयोजित करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अनंत रमेश निकम यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना कायदेशीर स्मरणपत्र सादर केले आहे. तालुकास्तरीय आमसभा तातडीने आयोजित करण्यात यावी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सभेसाठी वेळ निश्चित करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
निकम यांनी दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ तसेच ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयांचा उल्लेख करत दरवर्षी तालुकास्तरीय आमसभा घेणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे. यापूर्वीही अनेक वेळा स्मरणपत्रे देऊन पाठपुरावा करण्यात आला असून प्रशासनाकडून आमसभा घेण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, तालुक्यात शेतकरी, नागरिक व ग्रामीण भागाशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असून अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, भरपाई, महसूल विभागातील प्रश्न, आरोग्य सेवा तसेच विविध स्थानिक समस्यांवर सार्वजनिक चर्चा होणे आवश्यक असल्याचे निकम यांनी म्हटले आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना प्रशासनाला जाब विचारण्याचा संवैधानिक अधिकार असून, लवकरात लवकर आमसभा आयोजित न झाल्यास पुढील कायदेशीर पावले उचलण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.