बारामती वनविभागाची धडक कारवाई; विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

बारामती वनविभागाने अवैध वृक्षतोड व विनापरवाना लाकूड वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत मौजे रुई गावच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे ८ ते ९ टन कडूनिंब व जांभूळ प्रजातीचे लाकूड हस्तगत करण्यात आले असून वाहन चालक व मालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती-भिगवण रोडकडून बारामती एमआयडीसी परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर वनविभागाच्या पथकाकडून नियमित गस्त सुरू होती. यावेळी पारवडी येथील वनरक्षक संतोष जराड व हंगामी रोजंदारी मजूर यांच्या पथकाला टाटा कंपनीचा पांढऱ्या क्रीम रंगाचा टेम्पो संशयास्पद स्थितीत आढळून आला.
पथकाने वाहन थांबवून तपासणी केली असता, टेम्पोमध्ये कडूनिंब व जांभूळ या वृक्ष प्रजातींचे मोठ्या प्रमाणात लाकूड भरलेले असल्याचे दिसून आले. संबंधित चालकाकडे लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे नसल्याने वाहनातील मुद्देमाल बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले.
वनविभागाने तत्काळ कारवाई करत लाकूड आणि टेम्पो ताब्यात घेत पुढील चौकशीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा केले. दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणी वाहन चालक व मालकाविरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम ४१, ४२ व ५२ (१) अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, वनपाल एस. आर. उंडे आणि वनरक्षक संतोष जराड हे अधिक तपास करीत आहेत. अवैध वृक्षतोड व वनसंपत्तीची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.
वनसंपत्तीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असून, अवैध वृक्षतोड किंवा संशयास्पद लाकूड वाहतूक आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.