लोकशाही पद्धतीने डी. आर. हायस्कूलमध्ये मॉनिटर पदाची निवडणूक संपन्न
नंदुरबार : डी. आर. हायस्कूल, नंदुरबार येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ अंतर्गत इयत्ता सातवी ‘ब’ वर्गाच्या मॉनिटर पदाची निवडणूक लोकशाही पद्धतीने उत्साहात पार पडली. या उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संजय सैंदाणे, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, वर्गशिक्षक निलेश गावित तसेच प्रशांत पाटील उपस्थित होते.
मॉनिटर पदासाठी जोशी आदित्य, बजरंगे श्रेयस आणि माळी पंकज या विद्यार्थ्यांनी उमेदवार म्हणून सहभाग नोंदविला. निवडणुकीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी उत्साहात प्रचार केला. उमेदवारांनी प्रचारासाठी डिजिटल स्टिकर व बॅनरचाही वापर केला.
यावेळी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया, मतदानाचा अधिकार, मतदानाचे कर्तव्य तसेच लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मतदार यादी, मतदार स्लिप, बॅलेट पेपर यांची माहिती देऊन मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सजग नागरिक बनण्याचे आवाहन केले. तसेच मतदान प्रक्रियेद्वारे वृक्षलागवडीचा संदेशही देण्यात आला.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यास मदत होते तसेच लोकशाही मूल्यांचे संवर्धन होऊन लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजते.