क्रांतीच्या विचारांचा अखंड जागर! लोकनायक राजदत्त (आबासाहेब) उबाळे यांच्या प्रेरणाभूमीवर भावपूर्ण अभिवादन…..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-23 at 7.39.50 PM

क्रांतीच्या विचारांचा अखंड जागर! लोकनायक राजदत्त (आबासाहेब) उबाळे यांच्या प्रेरणाभूमीवर भावपूर्ण अभिवादन…..!
सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांतून माजी सैनिक, वैद्यकीय, विधिज्ञ, पत्रकार, विविध क्षेत्रातील, पक्ष-संघटना पदाधिकारी व युवकांची मोठी उपस्थिती; वीरचक्र अर्पण करून क्रांतिकारी विचारांना मानवंदना. (ता. इंदापूर जी. पुणे)

पिंपरी बु
प्रतिनिधी: समाधान रजपूत.
दिनांक: २३/०६/२०२६

समाजहितासाठी आयुष्यभर निस्वार्थपणे झटणारे, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढणारे आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे लोकनायक राजदत्त (आबासाहेब) उबाळे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त वालचंदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील ‘प्रेरणाभूमी’ येथे मंगळवारी क्रांतिकारी वातावरणात अभूतपूर्व अभिवादन करण्यात आले. समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांनी उपस्थित राहून लोकनायकांच्या संघर्षमय जीवनकार्याला कृतज्ञतेची मानवंदना अर्पण केली.
पहाटेपासूनच प्रेरणाभूमीवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील माजी सैनिक, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, बारामती व इंदापूर येथील विधिज्ञ, विविध शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, पत्रकार, संपादक, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच असंख्य युवकांनी उपस्थित राहून लोकनायक राजदत्त उबाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. माजी सैनिकांच्या हस्ते वीरचक्र अर्पण करून या वीरयोद्ध्यास विशेष मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करून भगवान गौतम बुद्धांना वंदन केले. पुढे उपस्थित मान्यवरांनी लोकनायक उबाळे यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या संघर्षशील, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा गौरव केला.
लोकनायक राजदत्त (आबासाहेब) उबाळे यांनी कोणताही जाती-धर्म, पक्ष किंवा पंथ यांचा भेदभाव न करता सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. त्यामुळे त्यांच्या कार्याचा प्रभाव पंचक्रोशीपुरता मर्यादित न राहता अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचला. समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आजही हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
आजच्या स्वार्थी राजकारणाच्या आणि समाजात वाढत्या दुराव्याच्या काळात लोकनायक उबाळे यांचे निस्वार्थ समाजकारण, जनसंपर्क, धाडसी नेतृत्व आणि सामाजिक समतेसाठीचा संघर्ष नव्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरत असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. त्यांच्या स्मृती केवळ अभिवादनापुरत्या मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचे जतन, सामाजिक एकोपा आणि लोकहिताची चळवळ अधिक बळकट करण्याची जबाबदारी समाजाने स्वीकारली पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दिवसभर विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी उबाळे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वनपर भावना व्यक्त केल्या. प्रेरणाभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या प्रत्येकाच्या मनात लोकनायकांच्या कार्याबद्दल आदर, कृतज्ञता आणि नव्या सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा स्पष्टपणे दिसून येत होती. क्रांतिकारी विचारांचा जागर, सामाजिक बांधिलकीचा संदेश आणि लोकसेवेची नवी ऊर्जा घेऊन उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमाची सांगता केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!