रिकाम्या पोटी व कार्यालय हिरवलेला
शिव सैनिक शिवसेना कशी वाढवेल?
आम्हीही बोलू शकतो, आम्हीही सभा गाजवू शकतो, शिवसेनेचा पुस्तकी इतिहास कोणीही सांगेल परंतु शिवसेना अनुभवलेला व अंगी बाणावलेला जीवंत इतिहास आमच्या सारखा तावून सलाखून निघालेला शिवसैनिक प्रभाविपणे मांडू शकतो. पण जिथे पिकते तिथे विकत नाही त्याला किंमत नसते. म्हणून कॉन्ट्रॅक्टवर वक्ते आणावे लागतात.
बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांना अभूतपूर्व मेजवानीच. तत्कालीन भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या इतकेच ते लोकप्रिय वक्ते होते. त्यांची ठाकरी भाषा तर जगावेगळी. द्विअर्थी शब्दप्रयोग हे त्यांचे प्रभावी अस्त्र होते. शिवसैनिकांत चेतना निर्माण करणारे जोशपूर्ण भाषण बाळासाहेबच करू जाणे. व्यंग्य चित्रातील ब्रशचे फटकारे आणि सभेतील आकाशभेदी फटकारे सभेचा नूरच पालटून टाकीत असे. नवाकाळ मध्ये त्यांचे भाषण शब्दश:छापून येई. हशा आणि टाळ्या प्रत्येक वाक्यागणिक असत. आचार्य अत्रे हे त्यांचे समकालीन वक्ते होते. तरी चर्चा मात्र बाळासाहेबांच्या भाषणाचीच होत असे. महाराष्ट्राची दशा विषद करणारे आणि भरकटलेल्या मराठी माणसाला दिशा देणारे वक्ते म्हणून बाळासाहेब हे अजरामर झालेत.
आमच्या काळी (आप्पा) वामनराव महाडिक यांच्या तोंडून सरस्वती बरसत असे. ते खरे शब्दप्रभू होते. विधानसभेत 1970 साली निवडून आलेले शिवसेनेचे पहिले आमदार. त्यांनी शपथ घेतली ती संस्कृत मधून. हा विक्रम कोणी मोडू शकलेला नाही. त्यांचे भाषण ओजस्वी असे.
दुसरी आमची मुलुख मैदान तोफ म्हणजे कमांडर दत्ताजी साळवी. काय त्यांची शब्दफेक, आरोह अवरोह आणि मर्मभेदी भाषा. त्यांनी ऐतिहासिक नाटकात अभिनय केल्याने आवाजतील भारदस्तपणा भालेफेकीचा आभास निर्माण करीत असे. मंत्रमुग्ध करणारा फर्डा वक्ता.
तिसरे आमचे सह्याद्री भ्रमण भूषण शिवभक्त साबीरभाई शेख. अल्पशिक्षित असूनही रामायण, महाभारत कोळून प्यालेले. छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांच्या इतक्या प्रभाविपणे ( बाबासाहेब पुरंदरे यांचा अपवाद ) मांडणारा त्याकाळी कोणी नव्हता. शिवरायांच्या गड किल्यांची खडा न खडा माहिती, ती देखील तारीख वार तिथीसह भाषणातून मांडणारा आमचा साबीरभाई. आम्हा हिंदूंना देखील ठाऊक नसलेली माहिती साबीरभाईना मुखोद्गत होती. मी 1975 साली त्यांच एक व्याख्यान ठेवले होते. विषय होता ” कैकयीची दुसरी बाजू. हा विषय त्यांनी इतक्या प्रभाविपणे व सप्रमाण मांडला होता की, कैकयी ही दुष्ट व कपटी स्त्री होती हा गैरसमज दूर होऊन तिच्या बाबत आदर निर्माण व्हावा.
मनोहर जोशी हे शांत संयमी परंतु अतिशय विद्वत्तापूर्ण भाषण करीत. ते भाषण नव्हे व्याख्यान देत आहेत इतके ते अभ्यासपूर्ण असे.
मधुकर सरपोतदार हे देखील खूप चांगले वक्ते होते. दत्ताजी साळवी सारखी त्यांची भाषणाची स्टाईल असे. अगदी दांडपट्टा फिरवावा तसे ते विरोधकांवर तुटून पडत.
सद्या अश्या वक्त्यांचा शिवसेनेत दुष्काळ आहे. त्यामुळे कधी नितीन बानगुडे पाटील, कधी सुषमा अंधारे आणि आत्ता नितीन चंदनशिवे हे वक्ते आयात करावे लागत आहे.
नितीन चंदनशिवे हे माझे कवी मित्र आहेत. एक दोन वेळा एकच व्यासपीठावर मी त्यांच्या सोबत कविता वाचन केले आहे. ते दंगलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पचारण केले. चंदनशिवे यांनी गरिबीचे, दारिद्र्याचे चटके सोसले, परिस्थितीशी संघर्ष करुन हातगाडीवरील भाजी विक्रेता, वॉचमन पासून प्रवास करुन ही उंची गाठली. परंतू शिवसैनिकांच्या व्यथा, विवंचना, भोग, पोलीस व कोर्ट कचेरी चे दाहक अनुभव त्यांनी पाहिलेले नाहीत. अनुभवायचा प्रश्नच नाही.त्यामुळे शिवसेनेच्या व्यासपीठावरून निष्ठावंत शिवसैनिकांना शिव सेना समजावून सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. आदित्य ठाकरे यांनी आत्ता बाहेर पडावे,असा सल्ला देऊन त्यांनी आदित्य ठाकरेंचे अवमूल्यन केले. सरस्वती ऐवजी सावित्री हे शिवसैनिकांच्या मेळाव्यात सांगण्याचे धाडस केले, स्वामी समर्थ यांच्या विषयी टिपणी केली. टाळ्या मिळवण्यासाठी जी वाक्ये भाषणात पेरावी लागतात ती चपलखपणे पेरून टाळ्या मिळवल्या.
एरवी महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या प्रबोधन यात्रा काढणाऱ्या सुषमा अंधारे टाळ्या वाजवण्या पुरत्या होत्या. शिव व्याख्याते व शिवसेनेच्या निवडणूक सभा गाजवणारे नितीन बानगुडे पाटील यांचा विसर पडला, की त्यांना पर्याय म्हणून चंदनशिवे यांना उभे केले.
मान्य आहे की शिव सेनेत प्रभावी वक्ते कमी आहेत, किंवा नसावेत. परंतू शिवसैनिकांची कार्यशाळा घेऊन वक्ते का घडवले जात नाहीत. संघात जसे कार्यकर्ते घडवले जातात, तसे का होत नाही. जुन्या निष्ठावंतांची ही अखेरची काही लोक उरले आहेत, ज्यांना बाळासाहेबांनी घडवले. त्यांच्या नंतर आलेले शिवसैनिक किती कट्टर आहेत, याचे वर्णन बाळासाहेबांच्या हयातीतच संजय राऊत यांनी केले होते. आत्ताचे शिवसैनिक पांढरपेशे झाले आहेत हे त्यांचे जाहीर वक्तव्य होते. मूळ शिव सैनिक हा कधीच पांढरपेक्षा नव्हता मात्र इतर पक्षातून आयात केलेले लोक नक्कीच पांढरपेशे होते. त्यांच्या मुळेच शिवसेनेची अशी वाताहात झाली.आता
नेतानिष्ठ शिवसैनिक तयार केले जातात. पक्षांपेक्षा नेत्याशी ते अधिक एकनिष्ठ असतात. त्यामुळेच एक आमदार शेकडो शिवसैनिक घेऊन जातो. पदाधिकारी, नगरसेवक गेले की त्या पाठोपाठ त्यांचे समर्थकही जातात. शाखा ओस पडतात. रातोरात शाखेवरील उबाठाच्या जागी शिंदे सेनेचे बॅनर बदलले जातात, उद्धव व आदित्य ठाकरेंच्या जागी एकनाथ व श्रीकांत शिंदे यांचे फोटो लागतात. सर्व हतबलतेने पाहणारे स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवतात. ठाण्याची शान असलेला आनंद आश्रम बदलून “महाराष्ट्राचे भाग्यविधाते एकनाथ शिंदे” असा बोर्ड लागतो. आम्ही संयमाची दिक्षा घेतल्याने मूग गिळून घेतो डोळे मिटून घेतो.
खरी शिवसेना ही ठाकरे यांचीच आहे, हे आपण कितीही कंठशोष करुन बोंबललो तरी आपले अस्तिव असणाऱ्या शाखाच जात असतील तर कुठे बसायचे? शिवसेनेचे कार्य कुठून सुरू ठेवायचे. नवीन शाखेसाठी निधी कुठुन आणायचा? तो कोण देणार ? कारण आमच्याकडे देण्यासारखे काहीच नाही. मग शाखा ही भाड्याने घ्यायच्या म्हटल्या तर त्याचे डिपॉझिट,भाडे, light बील कोणी भरायचे. आपल्याकडे निष्ठावंतांची फौंज आहे, पण सैनिकांलाही पोट असते, संसार असतो. रिकाम्या पोटी व संसार उघड्यावर टाकून जरी पक्ष वाढवायचा म्हटला तरी त्यांची दखल घ्यायला ही पक्षाला वेळ नसेल तर कसे होणार. कारण प्रत्येक विजयाचा मार्ग पोट भरल्यावरच सापडतो. पक्ष वाढवायचा असेल, अस्तित्व टिकवायचे असेल तर याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470