बारामती तालुका पोलिसांची कारवाई; बुलेट चोरी प्रकरणातील दोन आरोपी अटकेत
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या बुलेट मोटारसायकल प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यनगरी, बारामती येथील रहिवासी दीपक गुलाब बंडगर यांनी त्यांची बुलेट मोटारसायकल (क्रमांक एमएच 42 एयू 4344) 17 जून 2026 रोजी पहाटे पार्किंगमध्ये उभी केली होती. सकाळी ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 289/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले. तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, समीर विलास लोंढे (वय 20, रा. मलठण, ता. दौंड) व त्याचा साथीदार मयूर विकास बनकर (वय 20, रा. श्रीरामनगर, बारामती) यांनी सदर मोटारसायकल चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिगवण रोडवरील वनविभागाच्या परिसरात सापळा रचला. तेथे संशयित दोघेही आढळून आले. त्यांच्या शेजारी चोरीस गेलेली बुलेट मोटारसायकलही मिळून आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार रामदास जाधव, एकसिंगे, ढवण, महिला पोलीस हवालदार रचना काळे, भारती खंडागळे तसेच पोलीस शिपाई निलेश वाकळे यांनी सहभाग घेतला.