शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा युवासेनेचा जल्लोष, पण मुख्य शिवसेना संघटना कां राहिली अलिप्त?
अमळनेर : विक्की जाधव.
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात युवासेनेतर्फे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसेनेची जनसेवेची परंपरा, हिंदुत्वाची विचारधारा आणि संघटन बळकटीसाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी युवा सैनिकांनी व्यक्त केला. मात्र दुसरीकडे, संपूर्ण दिवसात शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर कोणताही स्वतंत्र वर्धापन दिन कार्यक्रम दिसून न आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे शहर व तालुक्यातील विविध पदांवर कार्यरत असलेले अनेक पदाधिकारी आणि जबाबदार कार्यकर्ते वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांपासून दूर राहिल्याचे चित्र दिसून आले. शिवसेनेच्या ६० वर्षांच्या ऐतिहासिक टप्प्यावर संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती अनेक शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे संघटनेतील अंतर्गत हालचालींबाबतही विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, युवासेनेने मात्र विविध ठिकाणी उत्साहात कार्यक्रम राबवत वर्धापन दिन साजरा केला. जिल्हाप्रमुख रोहित कोगटा आणि तालुकाप्रमुख गुलाब बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात तालुकाप्रमुख राहुल कंजर, शहरप्रमुख प्रवीण पाटील, जयेश चव्हाण, सनी चव्हाण, तुषार सोनार, पंकज चौधरी आणि यश हापसे यांनी पुढाकार घेतला. युवा सैनिकांनी मिठाई वाटप करत शिवसेनेच्या विचारांचा प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख भरत पवार, गटनेते व नगरसेवक पंकज चौधरी, प्रतोद व नगरसेवक नाविद शेख तसेच नगरसेवक दीपक चौगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मात्र या मोजक्याच पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर अनेक चेहरे दिवसभर दिसून न आल्याने “शिवसेनेचा वर्धापन दिन युवासेनेने साजरा केला, पण मुख्य संघटनेला त्याचा विसर पडला का?” असा प्रश्न शहरातील राजकीय चर्चांमधून उपस्थित केला जात आहे.