नीट घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेसचे तहसील कार्यालयावर आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
अमळनेर : विक्की जाधव.
जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. मराठा मंगल कार्यालय ते तहसील कार्यालय अशी पदयात्रा काढून उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या प्रकारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
याशिवाय येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट परीक्षेसाठी बाहेरगावी परीक्षा केंद्र मिळालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रवेशपत्र दाखवून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.