मुंदडा नगर भागातील इसमाचा प्रताप पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न करून महिलेची लाखोंची केली फसवणूक; एसआरपी कर्मचाऱ्यावर गुन्हा.crcr
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील मुंदडा नगर भागतील स्वतःला एपीआय असल्याचे सांगत एका महिलेशी विवाह करून तिच्याकडून २१ तोळे सोने, सुमारे सहा लाख रुपयांची रक्कम आणि दरमहा आर्थिक मदत घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीचे पहिले लग्न झालेले असून त्याला दोन मुले असल्याची बाब नंतर समोर आल्याने महिलेने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी सुरेखा साळुंखे यांच्या तक्रारीनुसार, २०२२ मध्ये विनोद भटू सोनवणे याच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर बुलेट खरेदीसाठी ९८ हजार रुपये, शेती खरेदीच्या नावाखाली २१ तोळे सोने व पाच लाख रुपये त्याने घेतले. मात्र शेती खरेदी न करता वेळोवेळी आणखी पैशांची मागणी करण्यात आली. पैसे परत मागितल्यावर मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणाचा भांडाफोड जळगाव येथे शस्त्रक्रियेदरम्यान झाला. रुग्णालयातील कागदपत्रांमध्ये महिलेचे नाव बदलून ‘वैशाली’ लिहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर चौकशी केली असता संबंधिताची पहिली पत्नी वैशाली असून त्याला एक मुलगा व एक मुलगी असल्याचे समोर आले. फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासादरम्यान संबंधित व्यक्ती एपीआय नसून एसआरपी दलात कार्यरत असून सध्या काश्मीर येथे सेवेत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.