१० जागांसह राष्ट्रवादीचे वर्चस्व; ८०० मयत मतदारांच्या मतदानाच्या आरोपाने निकालानंतर नवा वाद
अमळनेर : विक्की जाधव.
बहुचर्चित शेतकी संघ निवडणुकीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवत १५ पैकी तब्बल १० जागांवर झेंडा फडकावला आहे. या विजयामुळे शेतकी संघावर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली असून काँग्रेसच्या शेतकरी पॅनलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजप खासदार स्मिता वाघ यांच्या किसान विकास पॅनलला अवघ्या २ जागा मिळाल्याने भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. जाणू भाजपाचे अमळनेर तालुक्यातील वर्चस्व संपले असून भाजप पक्षावर शेतकऱ्यांची मोठी नाराजी दिसून आली आहे.
तर व्यक्तिशः, महिला, सोसायटी, एससी-एसटी आणि एनटी अशा विविध मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेत विजय मिळवला. महिला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवत काँग्रेसच्या महिला उमेदवारांचा पराभव केला. सोसायटी मतदारसंघातही राष्ट्रवादीने वर्चस्व राखले, तर काही जागांवर चुरशीची लढत पाहायला मिळाली. विशेष म्हणजे एका जागेसाठी समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीद्वारे निकाल लावण्याची वेळ निवडणूक प्रशासनावर आली. भाजपचे काही प्रमुख उमेदवार पराभूत झाल्याने संघाच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, निवडणुकीनंतर वादालाही तोंड फुटले आहे. सुमारे ८०० मयत व्यक्तींच्या नावावर मतदान झाल्याचा गंभीर आरोप करत काही उमेदवारांनी निकाल राखून ठेवण्याची मागणी केली आहे. तर सोसायटी मतदारसंघातील उमेदवार किरण गोसावी यांच्या नावानेच अज्ञात व्यक्तीने मतदान केल्याची तक्रारही निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे दणदणीत विजयासोबतच शेतकी संघ निवडणुकीवर संशयाचे सावट निर्माण झाले असून आता प्रशासन या तक्रारींवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.