अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचा महायज्ञ; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
अमळनेर : विक्की जाधव.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजसेवेचा वारसा जपत आणि “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.
या रक्तदान शिबिराचे आयोजन आम आदमी पार्टीचे अध्यक्ष महेंद्र (नाना) साळुंखे, उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण पाटील आणि ललित सातपुते यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. शिबिरात एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत रक्तदान केले. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी हा उपक्रम जीवनदायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान अनेक सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी विचारांना अभिवादन करत समाजहितासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. रक्तदान शिबिरामुळे जयंती उत्सवाला सामाजिक सेवेची जोड मिळाली असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.