मार्मिकच्या बातमीचा दणका; अखेर नगरपरिषद प्रशासन आणि नगरसेवकांना जाग!
मार्मिकने प्रश्न उचलताच झाल्या हालचाली; पण अमळनेरकरांना पाणी कधी?
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने नागरिकांचे अक्षरशः हाल सुरू असताना अखेर मार्मिक समाचार ने याबाबत आवाज उठवत
“बेजबाबदार प्रशासनामुळे पाणीपुरवठ्याचा बोजवारा; पाण्यासाठी यात्रेकरू हैराण”
असे वृत्त प्रसिद्ध केले आणि त्यानंतर नगरपरिषद प्रशासनासह सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांना अचानक जाग आल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक दिवस नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा आरोप सर्व स्तरातून होत होता.
मार्मिकच्या वृत्तानंतर सर्व नगरसेवक अनवर्दे नदीपात्र येथे जाऊन पाणीपुरवठ्याची पाहणी करताना दिसले. मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या नळाला पाणी कधी येणार हा खरा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे.
केवळ पाहणी, चर्चा आणि फोटोसेशन करून अमळनेरकरांची तहान भागणार का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. “पाण्याचा प्रश्न सोडवा, फोटो काढू नका,” अशी भावना शहरभर व्यक्त होत आहे.
दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनीही नगरपरिषदेच्या नियोजनावर जोरदार टीका करत
“अमळनेर नगरपरिषदेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे,” असा आरोप केला. उन्हाळ्याची तीव्रता आणि यात्रा उत्सवाची गर्दी यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली असून यात्रेकरू आणि नागरिक दोघांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
यापूर्वी अनिल पाटील गटाच्या नगरसेवकांनी नगरपरिषद बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी स्क्रीन लावण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आता त्याच चर्चेला पुन्हा उधाण आले असून “सत्ताधारी नेमकं करतात तरी काय, हे अमळनेरकरांना दिसू द्या,” अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
एकीकडे अमळनेरचा सर्वात मोठा यात्रा उत्सव आणि दुसरीकडे पाण्याची भीषण टंचाई… अशा दुहेरी संकटात नागरिक होरपळत असताना नगराध्यक्ष परीक्षेत बाविस्कर आणि संपूर्ण सत्ताधारी गट फेल ठरल्याचा सूर आता सर्वसामान्यांमधून उमटू लागला आहे.
नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे फोटोसेशन रंगत असले तरी पाण्यासाठी खरी तळमळ कोणालाच नसल्याचा आरोप नागरिक उघडपणे करत आहेत.