“ढिसाळ नियोजनाचा फटका व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ!”
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपालिकेच्या ढिसाळ आणि निष्काळजी नियोजनामुळे शहरातील व्यवसायिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी असताना, मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरले असून नागरिकांसह व्यापारी वर्गही प्रचंड त्रस्त झाला आहे.

याचदरम्यान, काही भागात गटारीचे सांडपाणी थेट दुकानांमध्ये घुसल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अक्षरशः घाण पाण्यात उभे राहून दुकानदारांना आपला व्यवसाय चालवावा लागत आहे. यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली असून, अनेक दुकानांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.
यात्रेच्या निमित्ताने शहरात लाखो रुपयांची उलाढाल अपेक्षित असताना, अशा परिस्थितीमुळे व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. “ना पिण्याचे पाणी, ना स्वच्छता… मग व्यवसाय कसा करायचा?” असा संतप्त सवाल व्यापारी वर्गातून विचारला जात आहे. पालिकेच्या नियोजनशून्यतेमुळे आर्थिक फटका बसत असल्याची भावना स्पष्टपणे दिसत आहे.
एकीकडे पाण्याच्या टंचाईने नागरिक हैराण असताना, दुसरीकडे गटारीचे पाणी दुकानात घुसणे ही बाब प्रशासनाच्या अपयशाची साक्ष देत आहे. अमळनेर नगरपालिकेच्या कारभारावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिक आणि व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर आंदोलनाची ठिणगी कधीही पेटू शकते.