बेजबाबदार! प्रशासनामुळे “पाणीपुरवठ्याचा बोजवारा पाण्यासाठी यात्रेकरु हैराण!” नगराध्यक्ष स्वतः च्या व्यवसायात वेस्त
अमळनेर : विक्की जाधव.
नगर परिषदेच्या पाणीपुरवठा नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. भर उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिकांसोबतच यात्रेकरूंनाही पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. यात्रेत ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या पणपोई देखील कोरड्या पडल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यात्रेच्या काळात हजारो भाविक अमळनेरमध्ये दाखल होत असताना, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात नगरपरिषद पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसते. पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेसाठी लोकांना त्रास सहन करावा लागणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. “पाणी नाही, तर इतर व्यवस्था ही नाही” अशी परिस्थिती निर्माण झाल्याने यात्रेकरूंमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर हे स्वतःच्या व्यवसायात व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरातील वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. “आम्ही निवडून दिले ते कामासाठी, पण सध्या कोणीच विचारपूस करत नाही,” अशी भावना अमळनेरकरांमध्ये व्यक्त होत आहे.
नगरपरिषदेकडून देण्यात आलेले “दोन दिवसाआड पाणीपुरवठा” हे आश्वासन देखील पूर्णपणे फसले असून, अनेक भागात पाणी अनियमितपणे किंवा अजिबातच येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांचा संताप आता उफाळून येत असून, प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. आता तरी नगरपरिषद जागी होणार का, असा सवाल अमळनेरकर करत आहेत.