करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा येथील सर्वात जुनी व प्रसिद्ध असलेल्या नामसाधना प्राथमिक विद्या मंदिर नगर परिषद सेंट्रल स्कूल मुले नं. १ च्या मुख्याध्यापिका सुनंदा जाधव (माने) यांच्या पारदर्शक कारभारावर संशय घेऊन त्यांना नाहक मानसिक त्रास दिला जात असल्याचा खळबळजनक आरोप पालक समिती सदस्य तथा युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी केला आहे. निनावी तक्रारींमागचा सूत्रधार शिक्षण क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील अथवा वैयक्तिक सूडबुद्धीने पेटलेली काही विघ्नसंतोषी मंडळी असल्याचा संशय व्यक्त करत, त्यांनी अशा प्रवृत्तींचा तीव्र निषेध केला आहे.
सन १८६० मध्ये स्थापन झालेल्या या शाळेने आजवर अनेक MBBS, IIT आणि MBA चे उत्तम अधिकारी, डॉक्टर घडवले आहेत. मुख्याध्यापिका सुनंदा माने यांच्या ३४ वर्षांच्या सेवेपैकी १९ वर्षे त्यांनी याच शाळेचे नेतृत्व केले आहे. शाळेची जुनी कौलारू इमारत बदलून नवीन भव्य इमारत उभी करण्यामागे त्यांचे अपार कष्ट आहेत. स्वतः इमारत बांधकामावेळी पाणी मारण्यापासून ते शाळेच्या सुशोभीकरणापर्यंत त्यांनी ही शाळा एका कुटुंबाप्रमाणे सांभाळली असून, त्यांच्यामुळेच या शाळेला माने मॅडमची शाळा अशी स्वतंत्र ओळख मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी शाळेमार्फत दोन सहली काढण्यात आल्या होत्या. पहिली ऐच्छिक सहल होती, ज्याचा संपूर्ण हिशोब पालक समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. दुसरी सहल ‘पी एम श्री योजने’च्या अंतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून विद्यार्थ्यांकडून एकही रुपया न घेता आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या पी एम श्री सहलीच्या खर्चाची संपूर्ण माहिती आणि तपशीलही मुख्याध्यापिका माने यांनी पालक समितीला दिला होता.
मात्र, तरीही काही समाजकंटकांनी केवळ वैयक्तिक आकसापोटी मुख्याध्यापिकांनी सहलीचे पैसे लाटले अशी खोटी व निनावी तक्रार जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली. या तक्रारीनंतर तपासणी पथक शाळेत दाखल झाले, मात्र सुनंदा माने यांचा पारदर्शक कारभार पाहून तक्रारीत काहीही अर्थ उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पत्रकारांशी बोलताना विशाल गायकवाड म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पटसंख्या आणि गुणवत्तेत अव्वल असलेली ही शाळा मुख्याध्यापिका माने यांच्या कष्टाने उभी राहिली आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना अशा कर्तबगार महिलेला केवळ मत्सरापोटी त्रास देणे क्लेशदायक आहे. कोणी वैयक्तिक सूडबुद्धीने किंवा राजकीय हेतूने बदनामी करत असेल तर पालक समिती सदस्य म्हणून हे खपवून घेतले जाणार नाही. प्रशासन अधिकारी बनसोडे यांनी या प्रकरणात माने मॅडमच्या पाठीशी ठाम उभे राहावे. आम्ही या अन्यायाविरोधात शिक्षणमंत्र्यांकडे लेखी तक्रार करून संबंधित दोषींवर कारवाईची मागणी करणार आहोत.
शाळेची काही आदर्श वैशिष्ट्ये ठरली आहेत त्याचाही काही त्रास या विघ्नसंतोषी लोकांना होत आहे यामध्ये प्रामुख्याने शिष्यवृत्ती, नवोदय आणि पीटीएस परीक्षेत जिल्ह्यात अव्वल. असून निपुण महाराष्ट्र अंतर्गत ८०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सर्व शैक्षणिक निकष पूर्ण केले आहेत त्याच प्रमाणे लोकसहभाग, आनंद बाजार, वृक्षसंवर्धन आणि शिस्तबद्ध दिंडी सोहळा या मध्येही माने मॅडमच्या नेतृत्वाखाली नेत्रदिपक कामगिरी शाळेने केली आहे.
शेवटी गायकवाड या मागील खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध प्रशासन अधिकारी बनसोडे यांनी घेणे अपेक्षित आहे. कारण प्रशासन अधिकारी म्हणून ते या कारवाई बाबत अनभिज्ञ असू शकत नाहीत त्यांनी त्यांचे कर्तबगार महिला कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देणे गरजेचे आहे. जर प्रशासन अधिकारी यांचेकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसली नाही तर याबाबत मी शिक्षणमंत्री यांचेकडे प्रशासन अधिकारी व इतर संबंधित यांचे बाबत तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहे व वेळ पडली तर तीव्र आंदोलन छेडणार आहे.
एकंदर निवृत्तीच्या काळात एका प्रामाणिक शिक्षिकेला होणारा हा त्रास करमाळा तालुक्यातील पालकांच्या आणि नागरिकांच्या पचनी पडणारा नसून, या विघ्नसंतोषी मंडळींचा शोध घेऊन प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.