बारामतीत जागतिक महिला दिन व जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती तालुका यांच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिन आणि १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन यानिमित्त मुलींचे शासकीय वसतिगृह, एम.आय.डी.सी., बारामती येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात अँड. तुषार झेंडे पाटील (पुणे जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत) यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा कसा लागू झाला याची माहिती देत त्यातील ३६ कलमांचे सविस्तर स्पष्टीकरण केले. तसेच नव्याने लागू झालेल्या ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहकांना मिळणारे हक्क, तसेच राष्ट्रीय ग्राहक मंच आणि ई-कॉमर्स प्रणालीद्वारे ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ऑनलाईन व्यवहारांमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून कसे सावध राहावे याबाबतही विद्यार्थिनींना अत्यंत उपयुक्त माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या अधीक्षिका सविता भगवान खारतोडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व अशा ज्ञानोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, सहकोषाध्यक्ष सचिन चौधर, प्रसिद्धी प्रमुख वर्षा चव्हाण, नागेश देशमाने तसेच गुणवडी शिर्सुफळ प्रभाग संघाच्या अध्यक्षा ज्योती बोराटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री मुरगे यांनी केले तर आभार प्रदर्शन साक्षी भोसले यांनी केले. यावेळी वसतिगृहातील सर्व विद्यार्थीनी व सहयोगी कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.