करमाळा प्रतिनिधी(सागर गायकवाड):- युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत माय भारत या विभागामार्फत महाराष्ट्र राज्य युथ एक्सचेंज प्रोग्रॅमच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील तरुणांच्या कर्तृत्वाला आता राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत आहे. तालुक्यातील विशाल पांडुरंग शिंपी यांची १९ मार्च २०२६ ते २३ मार्च २०२६ या दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य युथ एक्सचेंज प्रोग्रॅम’ साठी निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील निवडक तरुणांना देशाच्या राजधानीत विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विशाल शिंपी यांनी आपल्या सामाजिक कार्याची आणि नेतृत्वाची चुणूक दाखवत या मानाच्या कार्यक्रमात स्थान पटकावले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल करमाळा तालुक्यात सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हा कार्यक्रम तरुणांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आणि त्यांना देशाच्या विविध भागांतील संस्कृतीशी परिचित करून देण्यासाठी राबवला जातो. दिल्ली येथे होणाऱ्या या पाच दिवसीय कार्यक्रमात विशाल शिंपी करमाळा तालुक्याचे आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
विशाल शिंपी यांच्या या यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक, मित्र परिवार आणि नातेवाईकांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीमुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.