करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- सध्याच्या इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली जागतिक परिस्थिती आणि इंधन टंचाईच्या शक्यता लक्षात घेता, गॅस वितरणाबाबत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. करमाळा येथील लक्ष्मी वैभव गॅस एजन्सीचे वितरक वैभव शेंडे यांनी ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले असून याचे पालन न करणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, सरकारने १९५५ चा अत्यावश्यक वस्तू कायदा लागू केला आहे. या कायद्यांतर्गत गॅसचा काळाबाजार किंवा गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा ठरेल. वितरणात पारदर्शकता ठेवण्यासाठीच हे कडक नियम लादण्यात आले आहेत.
गॅस सिलिंडर चे नियोजन करण्यासाठी आता गॅस बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, एका सिलिंडरनंतर पुढील बुकिंग ३० दिवसांच्या अंतरानेच करता येईल. ग्राहकांनी आपल्या गॅस वापराचे नियोजन याच कालावधीनुसार करणे आवश्यक आहे. तसेच गॅस सिलिंडरची डिलिव्हरी घेताना ज्या मोबाइल नंबरवरून बुकिंग केले आहे, त्यावर एक ‘डिलिव्हरी कोड’ (OTP) येईल. हा ओटीपी दिल्याशिवाय डिलिव्हरी पूर्ण होणार नाही. अनेकदा सिलिंडर घरी पोहोचते तेव्हा संबंधित व्यक्ती उपलब्ध नसते किंवा फोन बंद असतो, अशा वेळी वितरणात अडथळा येतो.ज्यांच्या फोनवर ओटीपी जातो, त्यांनी तो घरच्या व्यक्तींकडे देऊन ठेवावा, जेणेकरून डिलिव्हरी बॉईजचा वेळ वाचेल आणि तुम्हाला वेळेत गॅस मिळेल.

याबाबत अधिक माहिती देताना शेंडे यांनी सांगितले की, शासकीय नियमांनुसार प्रत्येक ग्राहकाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. करमाळा परिसरात अद्याप ९,००० ग्राहकांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधितांचा गॅस पुरवठा (टाकी) थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्वरित एजन्सीशी संपर्क साधून आपले रेकॉर्ड अपडेट करावे.
“आम्ही ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. जागतिक संकट आणि नवीन नियमांमुळे ग्राहकांनी सहकार्य करावे, संयम ठेवावा आणि नियमांचे पालन करून प्रशासनाला मदत करावी,” असे आवाहन लक्ष्मी वैभव गॅस एजन्सीचे मालक वैभव शेंडे यांनी केले आहे.