करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा तालुक्यातील पांडे येथे एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक चोरीची घटना समोर आली आहे. तहान लागल्याचे खोटे नाटक करून चोरट्यांनी मुनिलाल मुजावर यांच्या तब्बल १५ शेळ्या भरदिवसा एका स्विफ्ट कारमध्ये भरून लंपास केल्या आहेत. या दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि.१० मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उन्हाचा तडाखा वाढल्याने मुनिलाल मुजावर यांनी आपल्या शेळ्या करमाळा-पांडे रस्त्यावरील मोहळकर मळा येथील एका पिंपळाच्या झाडाखाली सावलीत बसवल्या होत्या. हे ठिकाण गावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. यावेळी तिथे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी येऊन थांबली. गाडीतील व्यक्तीने खाली उतरून खूप तहान लागली आहे पिण्यासाठी पाणी मिळेल का? अशी विचारणा केली. माणुसकीच्या नात्याने मुजावर यांनी पाणी आणून देण्याचे मान्य केले. जवळ पाणी नसल्याने ते दुचाकीवरून पाणी विकत आणण्यासाठी गावातील दुकानात गेले.
मुजावर गावात गेल्याची खात्री पटताच, चोरट्यांनी संधी साधली. झाडाखाली निवांत बसलेल्या पंधरा शेळ्या वेगाने गाडीत कोंडल्या आणि काही क्षणांतच तिथून पळ काढला. मुजावर जेव्हा पाण्याची बाटली घेऊन परतले, तेव्हा त्यांना तिथे ना गाडी दिसली ना त्यांच्या शेळ्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र चोरटे तोपर्यंत लांब पसार झाले होते.

भरदिवसा आणि वर्दळीच्या रस्त्या शेजारी अशा प्रकारे धाडसी चोरी झाल्याने पांडे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने माणुसकीचा गैरफायदा घेऊन हा गुन्हा केला आहे. या घटनेमुळे आता शेतकरी आणि मेंढपाळांनी आपल्या जनावरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
याप्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.