जय महाराष्ट्र चौक ते फुलसौंदर चौक रस्त्याची दुरवस्था; श्री गणेश व्यापारी मंडळाचे नगरपरिषदेकडे निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, हा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्यात यावा, या मागणीसाठी श्री गणेश व्यापारी मंडळ आक्रमक झाले आहे. मंडळाच्या वतीने आज मुख्याधिकारी, नगर परिषद करमाळा यांना लेखी निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली. सदरचे निवेदन कार्यालय अधिक्षक स्वप्नील बाळेकर यांनी स्विकारले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरातील जय महाराष्ट्र चौक ते फुलसौंदर चौक हा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. हा मार्ग व्यापारी पेठ, शाळा आणि रुग्णालयांना जोडणारा मुख्य दुवा असल्याने येथे २४ तास वर्दळ असते. मात्र, सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकीस्वारांचे अपघात नित्यनियमाचे झाले आहेत. मध्यंतरी खड्डे भरण्याचे काम झाले खरे, पण ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने परिस्थिती जैसे थे झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थी जखमी होत आहेत. तसेच रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या श्वसनाचे विकार बळावत आहेत. पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले असून, एखादा मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
सदर रस्त्याची पाहणी करून त्याचे तातडीने दर्जेदार डांबरीकरण करावे, जेणेकरून वाहतूक सुरक्षित होईल, अशी मागणी श्री गणेश व्यापारी मंडळाने केली आहे. निवेदनावर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, नगरपरिषदेने यावर तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी मंडळाने केली आहे.

यावेळी नगराध्यक्ष मोहिनी सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,

नुकतीच नगरपरिषदेची निवडणूक पार पडली असून पहिली सर्वसाधारण सभा २३ फेब्रुवारीला होणार आहे. करमाळा शहरातील सर्वच रस्ते दर्जेदार व धूळमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच करमाळ्याचे चित्र पालटलेले दिसेल. 

मोहिनी सावंत, नगराध्यक्षा, करमाळा नगरपरिषद 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!