दोंडाईचा: उपचार की उत्पन्नाचे साधन?…
दवाखान्यात शिरताना रूग्णांच्या मनात एकच भिती-आजार बरा होईल की आर्थिक कंबर मोडेल?…
जेव्हा रूग्ण असुरक्षीत असतो, तेव्हा समाज आजारी असतो…
दोंडाईचा- दोंडाईचा शहरात सध्या एक अस्वस्थ करणारा प्रश्न दबक्या आवाजात नव्हे, तर प्रत्येक रुग्णाच्या मनात ठळकपणे घुमत आहे- आपण रुग्ण आहोत की ‘कमाईचे साधन’? आज वैद्यकीय क्षेत्राकडे पाहताना “सेवा” हा शब्द केवळ जाहिरातीपुरता उरला आहे का, असा प्रश्न उपस्थीत होणे स्वाभावीक आहे. कारण अनेक रुग्णांचा अनुभव सांगतो की, उपचार सुरू होण्याआधीच त्यांच्या आर्थिक व मानसीक परीस्थीतीचा अंदाज घेतला जातो आणी त्यानंतरच उपचारांची दिशा ठरते.सरकारी आरोग्य योजना-ज्या गरीब, गरजू आणी सामान्य जनतेसाठी आहेत-त्या रुग्णकल्याणासाठी की खाजगी तिजोरी भरण्यासाठी वापरल्या जात आहेत?
गेल्या सहा महिन्यांत प्रभाग क्रमांक एक मधील किमान पाच ते सहा रूग्णांचे अनुभव या चिंतेला अधिक गडद करतात.चक्कर येणे, छातीत दुखणे, अस्वस्थ वाटणे, श्वास घेण्यास त्रास वाटणे, चालताना दम लागणे, पित्त वाढणे अशी सर्वसामान्य लक्षणे घेऊन दवाखान्यात उपचार घेतलेल्या रूग्णांचा अर्धवट खिसा खाली झाल्यावर या रूग्णांना थेट ‘ऱ्हदय शस्त्रक्रीयेचा सल्ला’ देण्यात आला. भीतीच्या छायेत अडकलेले हे रूग्ण पुढील उपचारासाठी नासीक किंवा इतरत्र ठिकाणी गेले.तिथे तपासणीनंतर अनेक प्रकरणात शस्त्रक्रीया टाळता आली.हा योगायोग आहे की,दोंडाईच्यातील वैद्यकीय व्यवहाराची दिशा तपासण्याची गरज अधोरेखीत करणारा गंभीर इशारा? हा प्रश्न आज अनुत्तरीत आहे.अव्वाच्या सव्वा औषधे, अनावश्यक तपासण्या,एक साधा ताप, सामान्य वेदना किंवा किरकोळ आजार असतानाही महागडी औषधे, सलग तपासण्या, स्कॅन, रिपोर्ट्स आणी वेळप्रसंगी शस्त्रक्रीयेचा सल्ला-हे वैद्यकीय गरजेतून की आर्थिक गणितातून? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
भारतीय वैद्यकीय परिषद, क्लिनीकल इस्टॅब्लिशमेंट अॅक्ट, ग्राहक संरक्षण कायदा
हे सर्व कायदे रुग्णांचे हक्क स्पष्ट करतात.तरीही रुग्ण आज स्वतःला असहाय्य ग्राहक समजू लागला आहे, ही बाब चिंताजनक आहे.
शहरातील सुविधा हॉस्पीटल बंद होण्यामागील गूढ काय? हस्ती टॉवरमध्ये एकाच छताखाली विविध तज्ञ डॉक्टर, सर्व प्रकारच्या व्याधींवर उपचार- अशी ओळख असलेले सुवीधा हॉस्पीटल अचानक बंद पडते आणी त्यामागचे कारण आजही “गुलदस्त्यात” राहते. प्रश्न साधा आहे-ते रुग्णहितासाठी बंद झाले की हित संबंधांच्या संघर्षामुळे नियामक यंत्रणांची तपासणी झाली का? कोण जबाबदार आहे-प्रशासन, व्यवस्थापन की यंत्रणांचा हलगर्जीपणा? कायदा काय सांगतो? रुग्ण हा केवळ उपचार घेणारा नसून तो हक्कधारक नागरीक आहे.अनावश्यक उपचार, दिशाभूल करणारी माहिती, आर्थिक शोषण हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरू शकते.
आज गरज आहे.वैद्यकीय व्यवहारांचे सामाजीक ऑडीट,सरकारी योजनांच्या अंमलबजावणीची स्वतंत्र चौकशी आणि रुग्ण हक्कांविषयी जनजागृती यांची.शेवटी एकच प्रश्न,जर उपचार हेच व्यापार झाले,आणी रुग्ण हा केवळ ‘केस’ ठरला,तर उद्या कोण सुरक्षीत राहील?दोंडाईचा शहराला आज उत्तर हवे आहे-आरोग्य व्यवस्था जनतेसाठी आहे की, नफ्यासाठी? सुरू आहे. आज हा प्रश्न केवळ दोंडाईचाच नाही -तो प्रत्येक सामान्य माणसाचा आहे. कारण जेव्हा रूग्णच असुरक्षीत असतो, तेव्हा समाज आजारी असतो. आज आवाज उठवला नाही, तर उद्या उपचार घेण्याआधी प्रत्येकाला न्यायालयाचा पत्ता विचारावा लागेल.