ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर;ट्रॅक्टर स्विफ्ट धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर
(निलेश गायकवाड)
राशीन रोडवरील राजपुरे पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (१३ जानेवारी) रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काञज गावचे रहिवासी अतुल बाबुलाल गजरमल (वय ३८) हे विजय हनुमंत शिंदे (वय ३८) आणि दादासो सर्जेराव डुबे (वय ३५) यांच्यासह स्विफ्ट कार मधून प्रवास करत होते. रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास भिगवणजवळील राजपुरे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या कारची ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या जोडलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली.
या अपघातात अतुल गजरमल यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी राजीव भावसाहेब गजरमल यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ट्रॅक्टर चालक चंद्रकांत कोकरे (रा. टाकळी, ता. करमाळा) याच्या ताब्यातील वाहनाशी हा अपघात झाल्याची नोंद करण्यात आली असून भिगवण पोलीस अधिक तपास करत आहेत.