राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त परीट महिला भगिनी मंडळाच्या वतीने गाडगेबाबा उद्यान, शिरपूर येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिजामातांच्या प्रतिमेचे पूजन सीमा ताई रंधे (मा. प्रदेशाध्यक्ष, परीट महिला मंडळ) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन दीपाली सूर्यवंशी (अध्यक्ष, शिरपूर महिला मंडळ) यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरेखा ताई बेडिसकर यांनी सादर केलेल्या मधुर गायनाने उपस्थित महिला भगिनींना मंत्रमुग्ध केले.
सीमा ताई रंधे यांनी मार्गदर्शन करतांना सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त परीट महिला मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमांमधून महिलांमध्ये शिक्षण, स्वाभिमान व सामाजिक जाणिवा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.या उपक्रमांसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व परीट महिला भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
सिमताई रंधे यांनी जिजामातांनी आयुष्यात घेतलेले कठोर निर्णय, समाजातील विरोध, संकटांशी केलेला संघर्ष आणि त्या संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व यांची प्रभावी मांडणी करत जिजामातांच्या संघर्षमय जीवनकहाणीला त्यांनी उजाळा दिला. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. तो काळ अत्यंत अस्थिर होता. निजामशाही, आदिलशाही आणि मुघल यांच्यातील संघर्षात मराठा सरदार विभागले गेले होते. जिजाऊंना अनेकदा माहेर आणि सासर वेगवेगळ्या सत्तांच्या बाजूने उभे असल्याचे पाहावे लागले. या राजकीय तणावाचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला. शहाजीराजे बंगळूरला असताना जिजाऊंनी पुण्याच्या जहागिरीची जबाबदारी स्वीकारली. त्या वेळी पुण्याची अवस्था अत्यंत बिकट होती. आक्रमणं, दुष्काळ आणि अस्थिरतेमुळे परिसर ओस पडला होता. जिजाऊंनी केवळ तिथे वास्तव्य केलं नाही, तर शिस्तबद्ध प्रशासन उभं केलं. कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला, शेतीला चालना दिली आणि लोकांना पुन्हा स्थिर जीवन जगण्याचा विश्वास दिला.
त्या केवळ शिवरायांच्या माता नव्हत्या, तर त्यांच्या राजकीय गुरूही होत्या. स्वराज्य ही कल्पना केवळ भावनिक नव्हती, तर ती कशी उभी करायची, कशी टिकवायची याचे धडे शिवरायांना जिजाऊंकडूनच मिळाले. शिस्त, न्याय, स्वाभिमान आणि प्रजाहित या मूल्यांची रुजवण त्यांनी बाल शिवाजींच्या मनात केली. वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक दुःखांना सामोरं जावं लागलं. युद्धातील हानी, आप्तांची चिंता आणि सततचा राजकीय दबाव असूनही त्यांनी कधीही आपले कर्तव्य सोडले नाही. शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर पाहिल्यानंतर काही दिवसांतच, १७ जून १६७४ रोजी पाचाड येथे त्यांचे निधन झाले. राजमाता जिजाऊंचे जीवन हे धैर्य, शिस्त आणि दूरदृष्टीचे उदाहरण आहे. त्यांनी एका पिढीला केवळ लढायला नाही, तर स्वराज्यासाठी जबाबदारीने जगायला शिकवले. जिजाऊ जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
यावेळी सविता ताई बेडीसकर, सविता वाघ, शितल सैंदाणे, मनीषा हरळे, संगीता सूर्यवंशी, मनीषा भिलाने, छाया बोरसे, पूजा लुंगसे, मनीषा महाले, विद्या देवरे, वैशाली सपकाळे, भाग्यश्री नेरकर व परीट महिला मंडळाच्या आदी भगिनी उपस्थित होत्या