अमळनेरच्या राजकारणात खळबळ : लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या जातवैधतेवर थेट न्यायालयीन आव्हान. जितु ठाकूर यांचे आरोपात किती तथ्य
अमळनेर : पत्रकार, विक्की जाधव.
अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर विराजमान झालेले डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांच्या अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्राला थेट न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार जितेंद्र (जितू) ठाकूर यांनी दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल करत, डॉ. बाविस्कर यांचे जातवैधता प्रमाणपत्र खोटे व बनावट असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पराभूत उमेदवाराचा थेट आरोप
जितेंद्र ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या पंचवार्षिक नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गासाठी राखीव होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी दाखल केली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. परीक्षित बाविस्कर यांना उमेदवारी देण्यात आली. प्रत्यक्षात त्यांचे ‘मल्हार कोळी’ जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा करत, विरोधी पक्षाने घाईघाईने चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
‘शासन व जनतेची फसवणूक’ असा दावा
ठाकूर यांनी पुढे आरोप केला की, कायद्याचे पुरेसे ज्ञान नसताना माजी आमदारांनी जात प्रमाणपत्राची खातरजमा न करता उमेदवारी दिली, त्यामुळे अमळनेरकर जनतेच्या भावनांशी खेळ झाला. “ही शासन आणि जनतेची मोठी फसवणूक असून, भक्कम पुराव्यांसह याचिका दाखल केली आहे. अवघ्या काही महिन्यांत डॉ. बाविस्कर यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल,” असा ठाम दावा त्यांनी केला आहे.
नगराध्यक्षांचा पलटवार
या आरोपांना उत्तर देताना नगराध्यक्ष डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “विरोधकांकडे आता कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत. पराभव स्वीकारता न आल्याने अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार असून, त्यांना योग्य ते कायदेशीर उत्तर दिले जाईल. आम्ही विकासाच्या व्हिजनसह कामाला सुरुवात केली आहे आणि त्यावरच आमचे लक्ष राहील.”
माजी आमदार शिरीष चौधरींची प्रतिक्रिया..
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही परखड भूमिका घेतली. “हेच कारण आहे की जनतेने तुम्हाला नाकारले आहे. खोट्या अफवा उडवून आणि तोडपाणी करून इथे यश मिळणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी जितू ठाकूर यांच्यावर टीका केली. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, या खोट्या आरोपांना कायदेशीर प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. डॉ. परीक्षित यांनी नगरपालिका सांभाळावी विरोधकांचा बाकी उर्वरित काम शिरीष चौधरी सांभाळतील. असे ही ते म्हटले
तज्ज्ञांचे मत : न्यायालयीन लढाई दीर्घकाळ चालू शकते
राजकीय जाणकारांच्या मते, निवडणुकीनंतर अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होणे नवीन नाही. पराभव-विजय हे राजकारणाचे दोन पैलू असून, जातवैधतेसंबंधी न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ चालू शकते. “अशा प्रकरणांचा निकाल लागायला चार-पाच वर्षेही लागू शकतात,” असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
शहर विकासाकडे लक्ष देण्याचा सल्ला
जाणकारांनी शेवटी सल्ला देताना म्हटले की, “डॉ. परीक्षित बाविस्कर यांना जनतेने बहुमताने निवडून दिले आहे. त्यांनी या आरोपांमुळे विचलित न होता शहर विकासावर लक्ष केंद्रित करावे. योग्य काम आणि पारदर्शक कारभार हाच अशा आरोपांना सर्वोत्तम प्रत्युत्तर ठरेल.”