December 10, 2025 4:38 am

बुडणाऱ्या जहाजाला भोकं पाडण्याचा भाजपचा प्रयत्न : हवालदिल शिंदे भाजपाचरणी लीन 

अपनी भाषा में पढ़े! Translate

बुडणाऱ्या जहाजाला भोकं पाडण्याचा भाजपचा प्रयत्न : हवालदिल शिंदे भाजपाचरणी लीन 

एकनाथ संभाजी शिंदे यांच्या गद्दारीला साडेतीन वर्षे झाली आणि वेळेपूर्वीच साडेसाती लागली. ज्या भाजपने मोठाभाऊ मानलेल्या शिव सेनेला २५ वर्षां नंतर धोका दिला तोच भाजपा एकनाथ शिंदेशी प्रामाणिक राहील, हे ज्यांना वाटते ते मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. एकनाथ शिंदेचा वापर महाराष्ट्रात भाजपाला एकछत्री राज्य करण्यास अडसर ठरणाऱ्या शिवसेना या शक्तिशाली पक्षावर घाव घालण्यासाठी कुऱ्हाडीच्या दांड्यासारखा केला. त्यात भाजपाला यशही लाभले. एकदा घाव घालून झाल्यावर जसा कुऱ्हाडीचा दांडा भिरकावून दिला जातो तसे एकनाथ शिंदे बाबत घडत आहे. काही महिन्यांपूर्वी मी सा. मार्मिकमध्ये लेख लिहिला होता की, “शिंदेचे पंख भाजपाच कापणार.”

आज जी परिस्थिती निर्माण केली आहे त्यामुळे भाजपाला शिंदेची गरज उरलेली नाही.भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, भाजपाला आत्ता कुबड्यांची गरज नाही.याचा अर्थ भाजपला आत्ता एकनाथ शिंदे व अजित पवार यांची गरज उरलेली नाही, त्यांच्या कुबड्या घेऊन भाजपने आपले ईप्सित साध्य केले आहे. भाजपची नितीच आहे “गरज सरो आणि वैदय मरो.”शिंदे व अजित पवार यांचे पंख छाटले नाहीत तर त्यांची राजकीय शक्ती व बार्गेनिंग पॉवर वाढेल, याची पुरती कल्पना भाजपच्या चाणक्याला नसणे असंभव. त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिंदे व पवारांना बळ दिले, त्यांच्या मनोरथांना खत पाणी घातले. त्यांच्या कुबड्या घेऊन महाराष्ट्रातले मराठी नेतृत्व असलेले दोन प्रबळ पक्ष खिळखिळे केले. आत्ता त्यांना शिंदे व पवारांच्या दोन कुबड्यांची गरज उरलेली नाही. अजित पवार यांना त्यांच्या मंत्री व मुलाच्या भानगडी उकरून काढून वेसण घातले. अजित पवार यांना पार्थ पवारला वाचवणे महत्वाचे असल्याने त्यांनी भाजपा समोर नांगी टाकली. शिवाय ७० हजार कोटी घोटाळ्याची टांगती तलवार आहेच डोक्यावर! पुरती नसबंदी करून टाकली आहे अजित पवारांची!

उरता उरले एकनाथ संभाजी शिन्दे. त्यांच्या माथ्यावर गद्दारीचा कलंक कोरून बदनाम केलेच होते. त्याउपर पन्नास खोके एकदम ओके, हा जारणमारण मंत्र ही होताच. अल्प सदस्य संख्या असूनही भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पद देऊन खुर्चीची चटक लावली. त्याच वेळी मी पुन्हा येईन, फेम देवाभाऊने जाळे विणण्यास सुरुवात केलीच होती. १३२ आमदार असताना ५७ आमदाराचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, हे भाजपने ठणकावून सांगताच “बंडोबा थंडोबा” झाले. आत्ता भाजपा देईल त्या तुकड्यावर दिवस कंठावे लागणार! याची त्यांना कल्पना आली. शिवाय सतत दिल्लीवारी करून शाह मोदींना कुर्नीसात करायला लावून स्वाभिमान गहाण ठेवायला लावून लाचार व हतबल करून टाकले. एके काळचा शिवसेनचा वाघ आत्ता लाचार प्राणी झाला हे भाजपाला दाखवून द्यायचे होते व त्यात ते यशस्वीही झाले.आज एकनाथ शिंदे पक्षाचे मुख्य नेते म्हणवत असले तरी स्वतःच्या पक्षाचे निर्णय घ्यायला, दिल्ली चरणी लोटांगण घालावे लागत आहे.

 

स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक ही शिंदे गटाच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यासाठी धडपडणाऱ्या एकनाथ शिंदेची अवस्था दयनीय झाली आहे. आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.एकनाथ शिंदेच्या सोकॉल्ड शिवसेनेचे माजी नगरसेवक व पॉवरफुल पदाधिकारी भाजप फोडत सुटला असून शिंदेची सेना सैरभैर झाली आहे. सैनिकांविना सेनापती अशी गत शिंदेची झाली आहे. ज्या मार्गाने शिंदेनी शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार व खासदार पळवले त्याच मार्गाने भाजपा शिंदेचे म्होरके हेरून फोडत सुटली आहे. शिंदेच्या कथित बालेकिल्ल्यातच शिंदेना शह देण्यासाठी भाजपने रवींद्र चव्हाण यांची राज्य प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती

करून काट्याने काटा काढण्यास जोरदार सुरुवात केली आहे. एका अर्थाने शिंदेची “शिल्लक सेना” करण्याचा वीडा भाजपने उचलला आहे. यात गंमत अशी की भाजपाच्याच प्रदेशाध्यक्षा विरोधात तक्रार घेऊन शिंदे भाजपाश्रेष्ठी कडे गेले आहेत. एका अर्थी शिंदे नावाचा हा प्राणी दयेची याचना करण्यासाठी कसायाकडे गेला आहे. “एकनाथराव केळं लावून रताळे येत नसते. तुम्ही तर धतुरे पेरले त्याला अमृताची फळं येण्याची अपेक्षा बाळगणे शहाण्याचे काम नोहे.” आपण पितृपक्ष संपवण्याचा वीडा उचलला आणि आत्ता सावत्र पित्याकडून जीवदान मागता. “हे कलियुग असले तरी नियतीची नियत बदलत नाही.” आपण जे पेरतो तेच बुमरॅन्ग होते हे लक्षात ठेवा. यालाच poetic justice म्हणतात.

– दिलीप मालवणकर

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!