प्रभाग 2 मधून सौ. शितल रामकृष्ण पाटील मैदानात महिला सक्षमीकरणाचा दृढ आवाज!
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 2 (सर्वसाधारण महिला) मधून नगरसेवक पदासाठी सौ. शितल रामकृष्ण पाटील यांनी दमदार पद्धतीने उमेदवारी जाहीर केली आहे. शांत स्वभाव, सेवाभावी वृत्ती आणि प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी असलेली जवळीक यामुळे त्यांच्या नावाची चर्चा उमेदवारीपूर्वीच सुरू झाली होती. प्रभागातील महिलांमध्ये “आपलीच उमेदवार… आपलाच आवाज” अशी भावना दिसून येत आहे. सौ. शितल पाटील यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे सामान्य कुटुंबातील महिला सक्षमीकरणासाठीची त्यांची लढाऊ भूमिका. महिलांच्या आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबनासंदर्भातील अनेक प्रश्नांवर त्यांनी मागील काही वर्षांपासून सातत्याने आवाज उठवला आहे. घरामध्ये आणि समाजात महिलांना भेडसावणाऱ्या छोट्या–मोठ्या अडचणी ओळखून त्यावर मार्ग शोधण्याची त्यांची कार्यपद्धती प्रभागातील स्त्रियांच्या मनाचा ठाव घेणारी बनली आहे. प्रभाग 2 मध्ये वाढलेल्या पाणीपुरवठा, रस्ते, गटारे आणि स्वच्छतेसारख्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठीही सौ. पाटील यांनी स्पष्ट रोडमॅप मांडला आहे. “महिलांच्या सुरक्षिततेसह सर्वसामान्यांच्या अधिकारांसाठी मी सदैव आवाज उठवेन” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, त्यानंतर प्रभागातील युवती, महिला आणि कुटुंबवत्सल मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समर्थनार्थ पुढे येताना दिसत आहेत. सौ. शितल पाटील यांच्या राजकीय प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये निवडणूक अधिक चुरशीची आणि विकासाभिमुख होणार हे निश्चित आहे.