शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; अमळनेर तालुक्यात अजूनही मदतीची प्रतीक्षा..

अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अक्षरशः अंधारात गेली आहे. २० जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान पावसाने दांडी मारल्याने मूग, उडीद, सोयाबीन आणि मका या खरीप पिकांचे उत्पादन तब्बल ४० टक्क्यांपेक्षा कमी आले. यानंतर १५ ऑगस्टनंतर झालेल्या सततच्या पावसामुळे कापसावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले आणि मोठ्या प्रमाणात कापूस पिक पाण्यातच वाहून गेले.

अशा परिस्थितीत शासनाकडून अपेक्षित आर्थिक मदत अजूनपर्यंत मिळालेली नाही. तालुक्यातील शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले असून, हे लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचे द्योतक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या थोड्याफार प्रमाणात मका विक्रीला उपलब्ध आहे, मात्र ओल्या मक्याला बाजारात फक्त ₹१४०० ते ₹१६०० इतकाच दर मिळत आहे, तर हमीभाव ₹२४०० आहे. कापसालाही अशीच परिस्थिती आहे. उत्पादन नाही, आणि जो माल आहे त्याला भाव नाही.

“अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी,” अशी मागणी प्रा. सुभाष जीभाऊ पाटील, अध्यक्ष किसान काँग्रेस, अमळनेर यांनी केली आहे.