अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे मोठे नुकसान.

अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यासह मांडळ परिसरात काल दिनांक २५ ऑक्टोबर रोजी दुपारी आणि रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत. या अवकाळी पावसाने विशेषतः कापूस, मूग, उडीद आणि बाजरी पिकांचे मोठे नुकसान केले असून, शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

पहिल्यापासूनच पावसाच्या अनियमिततेने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला उरला-सुरला घासही या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. मांडळ, अमळगाव, जानवे, पातोंडा, साकेगाव, खर्डे आदी भागांत अनेक शेतात पाणी साचल्याने पिकं कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.

“कर्ज काढून पिकवलेलं सोनं आता चिखलात गाडलं गेलं,” अशी व्यथा अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. पावसामुळे विजेच्या तारा तुटल्या, रस्ते चिखलमय झाले आणि वाहतूक ठप्प झाली.तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्त क्षेत्राचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी करत आहेत.
