रंग निवडणुकीचे आणि रंग नेत्यांचे…
कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं-निष्ठा म्हणजे आंधळेपणा नव्हे…
सत्ता मिळवण्यासाठी रंग बदलणाऱ्यांपेक्षा निष्ठेचा रंग टिकवणारे कार्यकर्तेच लोकशाहीचे खरे रक्षक!…
जनमत-
दोंडाईचा-
राजकारणात रंगांचे महत्त्व केवळ ध्वजापुरते नाही, तर ते निष्ठेच्या आणि मूल्यांच्या रंगांनाही स्पर्शून जाते. सत्तेच्या लोभात काही नेते निवडणुकीच्या वेळी रंग बदलतात, तर काही कार्यकर्त्यांचा रंग त्यांच्या रक्तातच मिसळलेला असतो. निष्ठेचा, संघर्षाचा आणि जनतेच्या विश्वासाचा.मात्र सत्तेच्या हव्यासापायी आज हेच रंग फिके होताना दिसतात.निवडणुकीचा काळ आला की नेते आणि कार्यकर्ते रंग बदलतात.शत्रू मित्र होतो, मित्र शत्रु ठरतो आणि निष्ठा ही सत्ता टिकवण्याचं हत्यार बनते,अशी परिस्थिती आता गावात निवडणूक पार्श्वभुमीवर सुरू असल्याचे मत राजकारण विश्लेषक मंडळी मांडत आहे.
निवडणुकीच्या रणांगणात पक्ष बदलणे, एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करणे, शत्रूंशी हातमिळवणी करणे ही आता सामान्य बाब झाली आहे. मात्र, या खेळात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना, जनतेचा विश्वास आणि लोकशाहीचे मूल्य यांचा घोर अपमान होतो. जोपर्यंत सत्ता मिळत नाही, तोपर्यंत “शत्रू” असलेले नेते अचानक “मित्र” बनतात, आणि जो कार्यकर्ता सत्तेच्या चुकीच्या व्यवहारांवर प्रश्न विचारतो, तोच नकोसा होतो. ही मानसिकता केवळ पक्षनिष्ठेचा नव्हे, तर सामाजिक नात्यांचाही ऱ्हास घडवते.
नेते आणि कार्यकर्त्यांतील नातं हे विचारांवर आणि तत्त्वांवर आधारित असावं, नफा-तोट्याच्या गणितावर नव्हे. गाव, शहर किंवा जिल्ह्यातील राजकीय व्यवहारांत हे नातं टिकावं, म्हणूनच कार्यकर्त्यांनी “शत्रूशी मैत्री” करण्याचा मोह टाळावा, पण नेत्यांनीही त्यासाठी कार्यकर्त्यांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या वागणुकीचा विचार करावा. निष्ठावंत कार्यकर्त्यांना केवळ प्रचाराच्या काळात आठवणे आणि नंतर दुर्लक्षित करणे, हा दुजाभाव आता जनतेलाही पटत नाही.
लोकशाहीत विरोध हा शत्रुत्व नव्हे; तो आरशासारखा असतो, जो सत्ताधाऱ्यांना त्यांच्या चुका दाखवतो. परंतु, सत्तेचा मोह इतका वाढला आहे की आता तो आरसा झाकला जातो. नेत्यांनीच जेव्हा शत्रूंशी सत्तेसाठी हातमिळवणी केली, तेव्हा कार्यकर्त्यांनी निष्ठेच्या नावाखाली गप्प राहावे का, हा प्रश्न निर्माण होतो. लोकशाहीत प्रत्येकाला पक्षनिष्ठेपेक्षा राष्ट्रनिष्ठा आणि समाजनिष्ठा जपावी लागते आणि तीच खरी परीक्षा आहे. संविधानातील कलम 14 सर्वाँना समानतेचा अधिकार देते.मग तो अधिकार राजकीय पक्षाच्या आतही लागू होतो. कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवणे,त्यांची भुमिका समजून ऐकणे हे नेत्यांचं कर्तव्य आहे.पण दुर्देवाने सत्तेच्या गणितात या मुल्यांना दुय्यम स्थान दिलं जातं.शत्रुशी सत्तेसाठी हातमिळवणी करणारा नेता जेव्हा स्वतः च्या कार्यकर्त्यांला शत्रु म्हणतो, तेव्हा ती लोकशाही लज्जास्पद गोष्ट ठरते.राजकीय पक्ष हा केवळ निवडणूक लढवण्यासाठी नव्हे,तर समाजकारणासाठी असतो.त्यात कार्यकर्त्यांनी शत्रूंशी मैत्री वाढवू नये,हे खरेच पण त्याहून मोठं पाप म्हणजे नेत्यांनीच स्वार्थासाठी शत्रुंशी हात मिळवणी करणं आहे.,अशी कुती केवळ नैतीकतेच्या विरोधात नाही तर लोकशाहीतील समतेच्या आणि पारदर्शकतेच्या तत्वांनाही बाधक आहे. कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे,निष्ठा म्हणजे आंधळेपणा नव्हे.निष्ठा म्हणजे लोकशाही मुल्यांप्रती बांधिलकी.सत्ता बदलते पण निष्ठा टिकली पाहिजे.राजकीय रंग बदलले तरी विचारांचा आणि सेवाभावाचा रंग कायम राहीला पाहिजे.कार्यकर्ते ते आहेत,जे लोकशाहीच्या गाभ्यातील ऑक्सीजन पुरवतात.
आजच्या राजकारणात निष्ठा विकत घेता येते, पण विश्वास मिळवावा लागतो. निवडणुकीचे रंग बदलले तरी कार्यकर्त्यांच्या मनातील “सेवेचा रंग” बदलता कामा नये. कारण, कार्यकर्ते हेच शेवटी लोकशाहीचे मूलस्तंभ आहेत. तेच गावागावात नेत्यांची प्रतिमा उंच-उभी करतात, आणि तेच जनतेच्या मनात लोकशाही जिवंत ठेवतात.
म्हणूनच, सत्ता आली किंवा गेली, तरी निष्ठा हीच खरी सजावट असावी आणि मतदारांच्या मनात जो निष्ठावंत राहील, त्यालाच जनतेचा आशीर्वाद लाभेल. राजकारणाचे रंग बदलले तरी, निष्ठेचा रंग कायम राहू द्या.कारण तोच लोकशाहीचा खरा उत्सव आहे,असे मत नेत्यांचे रंग निवडणुकीत बदललेले पाहून जनमतात बदलत आहे.