
“उठा उठा दिवाळी आली हंडाभर पाणी” आणण्याची वेळ झाली. ऐन दिवाळीचा सण अन अमळनेरकरांच्या घरात पाणीच नाही..
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर शहरातील नागरिक पुन्हा एकदा पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. जळोद ते अमळनेर दरम्यानची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लिकेज दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, पुढील दोन दिवस पाणीपुरवठा उशिरा होणार असल्याची अधिकृत सूचना देण्यात आली आहे. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती उद्भवल्याने नागरिकांच्या नाराजीचा पारा चढला आहे.

दरवर्षी शेकडो वेळा अमळनेर नगरपरिषदेची पाणीपुरवठा लाईन दुरुस्तीसाठी बंद पडते, परंतु या बिघाडामागचे खरे कारण अद्याप अस्पष्टच आहे. ही खराबी केवळ तांत्रिक आहे की यात काही वेगळे षड्यंत्र दडले आहे, याचा तपास आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासन मात्र याबाबत मौन बाळगत असून, जबाबदार अधिकाऱ्यांची सुस्त झोप अजूनही कायम असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

भर उन्हाळ्यातही पाणी न मिळालेल्या अमळनेरकरांना आता सणासुदीच्या काळातही तहान भागवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. रस्ते तोडून ठेवलेल्या पाईपलाईन्स, दुरुस्तीचे अर्धवट काम आणि नगरपरिषदेचा निष्क्रिय दृष्टिकोन यामुळे नागरिकांचा संयम संपत चालला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडून कोणतीही ठोस भूमिका दिसत नसल्याने जनतेचा रोष वाढत आहे.

नगरपरिषदेकडून देण्यात आलेली पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्ट लेबर व्यवस्था ही बेकायदेशीर पद्धतीने दिली गेल्याचा गंभीर आरोपही पुढे येत आहे. मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा अभियंता हे तथाकथित “मलिदा खाण्यात” व्यस्त असल्याने जनतेच्या मूलभूत गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शासकीय वेळेतही अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अमळनेरकरांना न्याय मिळेल का? असा प्रश्न आता प्रत्येक नागरिक विचारू लागला आहे. शहरातील प्रत्येक नळ कोरडा असताना, प्रशासन मात्र मौनात बुडालेलं दिसतंय!