वाचनानेच घडतो खरा विकास” — जयपालसिंह गिरासे
आढे (ता. शिरपूर) येथे वाचन प्रेरणा दिवस तथा वाचनालयाचा १६ वा वर्धापन दिन साजरा; ग्रंथप्रदर्शन व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात!
शिरपूर (प्रतिनिधी): वाचन हीच खरी माणसाच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे. नियमित वाचनामुळे विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो, असे मत वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना
पत्रकार तथा पिंपरीचे पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी व्यक्त केले.
शिरपूर तालुक्यातील आढे येथे लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाचा १६ वा वर्धापन दिन व वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पुजन आणि लोकमान्य टिळक तथा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शनपर व्याख्यान, ग्रंथप्रदर्शन आणि वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
या वेळी धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक व आढेचे पोलीस पाटील राजकिरण राजपूत, संस्थेच्या उपाध्यक्षा वेणूबाई राजपूत, वाचनालयाचे उपाध्यक्ष अजितसिंग राजपूत, दिलीप गिरासे, सुरेखा पाटील, सिंधुबाई राजपूत, छाया गिरासे, संगीता गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथप्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल दक्षा गिरासे, सहायक आशा राजपूत आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.