ए दिलीप तू आहेस की गेलास ?
साहेब, असं का बोललात ?
मी बघतोय, गेले तीन दिवस तू गप्पच आहेस.तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती.
साहेब, मी अजून समजलो नाही, तुम्ही असे कोड्यात का बोलता?
मग तुला समजेल अश्या भाषेतच सांगतो. अरे तो संजय राऊत माझ्या बद्धल जे काही बोलला त्यावर तू काहीच कसा व्यक्त झाला नाहीस. तुला पण वाटतं का की मी नेता नव्हतो, फक्त जिल्हा प्रमुखच होतो!
त्या संजय राऊत बद्दल बोलता का ?
त्याचं काय मनावर घेता. त्याचं म्हणणं
कोणी मनावर घेत नाहीत. आपले विरोधक तर त्याला भोंगा म्हणतात.
पण त्या भोंग्याने माशिदीवर बसून बोंबलावं माझ्या वाटेला का गेला. मी जिवंत असतो तर त्याची हिम्मत झाली नसती. कानफडवलाच असता त्याला.
साहेब जाऊ द्या. मुळात तो सामनाचा संपादक होण्या आधी शिवसैनिक तरी होता का? तुम्ही १९७० पासून शिवसैनिक म्हणून कार्यरत होतात,त्यावेळी त्याचे वय काय असणार. तो लोकप्रभाचा उपसंपादक व crime reporter म्हणून काम करीत होता. त्या काळात त्याने शिव सेने विरोधात काय काय लिहिले होते ते काय तुम्हाला ठाऊक नाही का ?
तुला तर ठाऊकच आहे, तो जाणून बुजून माझ्याकडे आला व खोपकर हत्ये प्रकरणी माझ्या तोंडी जे वाक्य पेरले, त्यामुळेच मला टाडा लागला होता.
हो ना,एकनाथ शिंदेच्या धर्मवीर चित्रपटात ते स्पष्टपणे दाखवले आहेच.तो वारंवार एकाच प्रश्न विचारून तुमच्या मृत्यूबद्दल संशय निर्माण करताना आपण पहिलेच आहे.
तू मला सांग सामनात येण्याआधी तो कधीतरी शिवसैनिक होता का? त्याला आपण राज्यसभेचा खासदार केले, एकदा नाही तर तीन वेळा, म्हणून तो स्वतःला नेता समजू लागला आहे. एकदा तरी तो निवडून आला आहे का ? निवडून येऊ शकतो का ?
जाऊद्या ना साहेब, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी त्याच्याच तोंडावर उडते. तुम्ही लोकनेते होतात, शिव सैनिकांचे तारणहार होतात, आमचे दैवत होतात. आजही तुमचे फोटो असंख्य नागरिकांच्या घरात आहेत. हे भाग्य त्या संजय राउतच्या नशिबी सात जन्मात तरी येईल का?
हे त्याला समजत नसेल असे तुला वाटते का? अरे तो एकनाथ कसाही असेना, त्याने माझ्या नंतर २२ वर्षांनी मला घराघरात पोहचवले. त्यात त्याचा स्वार्थ होता! असे तू म्हणशील हे मला ठाऊक आहे.पण या संजय राउतला माझी एलर्जी का ?
साहेब, त्याने तर बाळासाहेब हयात असताना, शिव सैनिक हे पांढरपेशे झालेत म्हणून बोलले होते. त्यावेळी बाळा साहेबांनीच त्याला झापले होते. त्याने तुम्ही नेते नव्हतात, उपनेतेही नव्हतात तर एक जिल्हा प्रमुख होतात असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय वाटून घ्यायचे?
अरे, मी अश्या लोकांना फाट्यावर मारतो. पण याला गरजच काय. त्या एकनाथने बाळा साहेबां शेजारी माझा फोटो लावला तर याची का करपली?
तो काहीही बोलो. साहेब तुम्ही मनात आणले असते तर, नगरसेवक , महापौर, आमदार, खासदार व मंत्रिही होऊ शकला असतात. तुम्हाला लोकांनी थेट निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून दिले असते. असे त्याच्या सारखे मागच्या दाराने नेते पद मिळवायची गरज भासली नसती.
तुम्ही किंग मेकर होतात, बाळासाहेबांसारखे “मी कधीही निवडणूक लढवणार नाही” असा पण केला व अखेरपर्यंत पाळला.म्हणून बाळासाहेबां नंतर तुमचे स्थान आहे. ठाणेकर तर तुम्हाला बाळासाहेबांचे प्रतिरूपच मानत होते.तुम्ही भाजपच्या जबड्यातून ठाणे लोकसभा मतदार संघ काढून एक आव्हान स्वीकारले व प्रकाश परांजपेंना निवडून आणले, गणेश नाईकांसारख्या मातब्बर बंडखोरा विरोधात सीताराम भोईर सारख्या नवख्या उमेदवाराला निवडून आणले. अनेक आंदोलनात अग्रेसर होतात,, गोर गरीब, गरजूनचे दैवत होतात, माता -भगिनींचे आधारवड होतात.
तरी हा असा का बोलला असेल?
त्याचे कारण मला ठाऊक असले तरी मी आज सांगू शकत नाही. पण एक सांगतो, हिंदुहृदय सम्राट बाळासाबांनंतर तुमचेच स्थान आहे, ते तमाम शिवसैनिकांना मान्य आहे. संजय राऊत हे जरी राज्य सभेचे खासदार, प्रवक्ते व संपादक असले तरी ते तुमच्या बद्दल बोलण्याच्या योग्यतेचे नाहीत.
तुम्ही क्रमांक २ चे नेते होतात, बाळा साहेबांनंतर आम्ही तुम्हालाच नेते मानतो व मानत राहणार, तुमचे स्थान अढळ आहे, त्याला धक्का लावण्याची धमक कोणात म्हणजे कोणातही नाही.
अरे, तु असे जाहीर बोललास तर तुझ्यावर कारवाई होईल, ती पण शिस्तभंगाची.
साहेब मी पक्षनिष्ठ शिवसैनिक आहे, नेता निष्ठ नाही. हे तुम्हाला पण ठाऊक आहे. १९८८ साली मी तुम्हाला ही जाब विचारला होता, धर्मवीर अद्याप गप्प का?
तेव्हा तुम्हाला ती शिस्त भंग वाटली नाही उलट तुमच्या मानत माझ्या बद्दल आदर निर्माण झाला होता.
अरे पण आज तशी परिस्थिती नाही. स्पष्टवक्तेपणा हा गुन्हा मानला जातो.
तर मी पण बाळासाहेबांचा व तुमचा
शिवसैनिक आहे, स्पष्टवक्तेपणा हा गुन्हा असेल तर तो माझ्या स्थायीभाव आहे, मी तो गुन्हा पुन्हा पुन्हा करण्यातच धन्यता मानीन.
चल आता खूप वेळ झाली, नंतर पुन्हा येईन तुझ्याशी बोलायला. जय महाराष्ट्र!