“नाभिक आणि परीट धोबी समाजासाठी एससी आरक्षणाची मागणी ; लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेवरून राज्यात वादंग”
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव, अमळनेर
महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा नवा वाद पेटला आहे. ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी नाभिक आणि धोबी समाजाला अनुसूचित जाती (एससी) आरक्षण देण्याची मागणी पुढे केली आहे. त्यांचा दावा आहे की, देशातील इतर अनेक राज्यांत या समाजांना एससी वर्गात मान्यता मिळते, मग महाराष्ट्रातच त्यांना अन्याय का सहन करावा लागत आहे? हाके यांच्या या ठाम भूमिकेमुळे या समाजांत नव्या उमेदीने चळवळ सुरू झाली आहे.
मात्र, या मागणीला राजकीय स्तरावर विरोधाचे सूरही उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांनी हाके यांच्या भूमिकेचा निषेध करत, “अशा अवास्तव मागण्यांमुळे महाराष्ट्रातील जातीय सलोखा धोक्यात येईल” असे स्पष्ट केले आहे. त्यांनी हाके यांना “अतिउत्साहात समाजात तणाव निर्माण करू नये” असा इशाराही दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद अधिकच चिघळला आहे.
दरम्यान, नाभिक आणि परीट-धोबी समाजांनी मात्र आरक्षणासाठी लढा देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही हक्काची मागणी करत आहोत, अन्याय सहन करणार नाही,” असा समाजबांधवांचा सूर आहे.
लक्ष्मण हाके यांची मागणी योग्य असल्याचे अनेकांचे मत असून, यामुळे राज्यातील आरक्षणाचा मुद्दा नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. येणाऱ्या काळात जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर युवा परीट धोबी समाजा कडून तहसीलदार, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात येणार आहे असे समजते. समाजाने मागणी लावून धरल्याने हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.